मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा ऐतिहासिक दोनशेवा सामना नेमका कुठे होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पण हे कोडे आता सुटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सचिनच्या विनंतीचा आदर ठेवत दोनशेवा सामना तो ज्या मैदानावर लहानाचा मोठा झाला त्या वानखेडेवर खेळवण्याचे आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) रवी सावंत यांना दिले आहे. बीसीसीआयच्या कार्यक्रम आणि वेळापत्रक समितीची बैठक मंगळवारी होणार असून त्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
सचिनने गुरुवारी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. या वेळी त्याने बीसीसीआयला माझा दोनशेवा अखेरचा सामना माझ्याच मातीत खेळविण्यात यावा अशी विनंती केली होती. त्याच्या या विनंतीचा मान बीसीसीआयने ठेवला आहे.
सचिनच्या दोनशेवा सामना मिळवण्यासाठी बऱ्याच क्रिकेट संघटना इच्छुक होत्या. जगमोहन दालमिया यांच्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) हा सामना आम्हाला मिळावा, अशी इच्छा प्रकट केली होती. त्याचबरोबर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने हा सामना ब्रेबॉर्नवर व्हावा, अशी इच्छा वर्तवली होती. त्याचबरोबर एमसीएदेखील या सामन्यासाठी इच्छुक होती.
शुक्रवारी एन. श्रीनिवासन हे येथील बीसीसीआयच्या कार्यालयामध्ये आले होते. त्या वेळी रवी सावंत यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी सावंत यांनी सचिनचा दोनशेवा सामना कुठे होणार, असा प्रश्न विचारला. यावर एन. श्रीनिवासन यांनी हा सामना सचिनच्या विनंतीला मान देऊन मुंबईत होणार असल्याचे सांगितले. यावर रवी सावंत यांनी हा सामना मुंबईत कुठे होणार? असे विचारल्यावर हा सामना वानखेडेवर होणार असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.

दिग्गज खेळाडूंचा सचिनला कुर्निसात
नवी दिल्ली : गेली अडीच दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वाने या महान फलंदाजाच्या कारकिर्दीला कुर्निसात केला. दिग्गज क्रिकेटपटूंनी ‘या सम हाच’ असलेल्या सचिनविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

असंख्य चाहत्यांना गेली २४ वर्षे क्रिकेटशी जोडणारा दुवा म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन आणखी किती वर्षे क्रिकेट खेळला असता हे महत्त्वाचे नाही. क्रिकेटसाठीचे त्याचे प्रेम, योगदान वाखाणण्याजोगे आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाज ही प्रतिमा त्याला कायम राखण्याची गरज होती. २०० कसोटी खेळणे ही साधी गोष्ट नाही. सचिनचे क्रिकेटवरील प्रेम कधीही कमी झाले नाही.
जेफ्री बॉयकॉट, इंग्लंडचे माजी कर्णधार.

सचिनच्या कारकिर्दीचा शेवट लवकरच येणार आहे, याची कल्पना होती; पण तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतच होईल, असे वाटले नव्हते. २००व्या कसोटीनंतरच निवृत्त होण्याची योग्य वेळ सचिनने साधली. मुंबईत घरच्या चाहत्यांसमोर निवृत्त होण्याचा योग सचिनला मिळणार आहे. हृदयाचा आवाज ऐकूनच सचिनने हा निर्णय घेतला आहे.
– राहुल द्रविड, भारताचा माजी कर्णधार

Story img Loader