IND vs AUS T20 series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. विश्वचषक २०२३च्या प्रदीर्घ मोहिमेनंतर वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ने जिंकली. अक्षर पटेल व्यतिरिक्त युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने अप्रतिम कामगिरी केली.
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनने रवी बिश्नोईचे कौतुक केले आहे. त्याने बिश्नोईचे कौतुक करताना त्याची तुलना महान खेळाडूंशी केली आहे. मुरलीधरनच्या मते, भारताकडे उत्तम फिरकी गोलंदाज आहेत, परंतु रवी बिश्नोई त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याने भारताचे माजी दोन दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन यांच्याशी बिश्नोईची तुलना केली आहे.
सामन्यानंतर जिओ सिनेमावर बोलताना मुरलीधरन म्हणाला की, “भारतात प्रत्येक पिढीमध्ये चांगला फिरकीचा एक गोलंदाज आहे. अनिल कुंबळेपासून ते रवी अश्विनपर्यंत आणि आता बिश्नोईसारखे तरुण खेळाडू बघायला मिळतात. मात्र, बिश्नोई इतर लेग स्पिनरपेक्षा वेगळा आहे.” रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ५ सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या युवा लेगस्पिनरला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे. त्यानंतर त्याची कामगिरी पाहता त्याला टी-२० विश्वचषकासाठीही संघातील दावेदार मानले जात आहे.
माजी लंकन फिरकीपटू मुरलीधरन म्हणाला, “तो स्पिन करताना वेगवान गोलंदाजी करतो. त्याचा चेंडू हा खूप वेगाने फिरतो, त्यामुळे फलंदाजाला स्विप शॉट मारताना अवघड होते. अक्षरही खूप अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो आहे. त्याचा चेंडू जास्त वळत नाही मात्र, लाईन खूप योग्य आहे. तो चेंडू जास्त वळवत नाही पण चेंडू स्पिन झाला तर फलंदाज बाद होतो. मग तो कधी त्रिफळाचीत, पायचीत किंवा यष्टीचीत होतो. त्याची लाईन अचूक आणि वेगवान टप्प्यावर असते.”
बंगळुरू येथे झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १६१ धावांचे लक्ष्य दिले होते. तर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कर्णधार सूर्यकुमार यादवच्या संघाने ६ धावांच्या फरकाने सामना जिंकला. या सामन्यात रवी बिश्नोईने ४ षटकात केवळ २९ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने घातक ट्रॅव्हिस हेडला गोलंदाजी दिली आणि त्याला वैयक्तिक २८ धावांपर्यंत रोखले.