Musheer Khan Road Accident: मुंबईचा क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज मुशीर खान याचा रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचा स्टार युवा फलंदाज मुशीर खान रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे. लखनौला जात असताना त्याचा रस्ते अपघात झाला आणि त्यांना फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. इराणी चषकापूर्वी मुंबई संघासाठी हा मोठा धक्का आहे. पण पोलिसांनी किंवा मुशीरच्या कुटुंबियांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुशीर आपल्या वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना रस्ता अपघात झाला, ज्यामुळे इराणी कप स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मुशीर खानचा अपघात नेमका कसा झाला आणि त्याच्या दुखापतीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. मुशीरच्या या अपघातातील दुखापतीमुळे इराणी कपच्या पहिल्या सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. मुशीरची अनुपस्थिती मुंबईसाठीही मोठा धक्का आहे, कारण १९ वर्षीय मुशीर भन्नाट फॉर्मात होता. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान रेस्ट ऑफ इंडिया वि मुंबई हा खेळवला जाईल. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या काही सामन्यांमध्येही मुशीर न खेळण्याची शक्यता आहे.
“मुशीर इराणी चषकासाठी मुंबईच्या संघासोबत लखनौला आला नव्हता. हा अपघात घडला तेव्हा तो कदाचित त्याच्या मूळ गावी आझमगडहून त्याच्या वडिलांसोबत लखनौला जात होता, त्यावेळी हा अपघात घडला,” अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिली आहे. अपघाताबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु निवडकर्ते लवकरच जखमी फलंदाजाच्या बदलीची घोषणा करतील, असे म्हटले जात आहे.
नऊ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ५१.१४ च्या सरासरीने ७१६ धावा केल्या आहेत ज्यात तीन शतके आणि एक अर्धशतक आहे. त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत. मुशीरने बंगळुरू येथे भारत अ विरुद्ध दुलीप ट्रॉफी पदार्पण करताना शानदार १८१ धावा केल्या. अंडर-19 विश्वचषकात तो अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये होता. मागील रणजी ट्रॉफी हंगामात, मुशीर खानने बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत नाबाद २०३ आणि विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यात १३६ धावा केल्या होत्या.
इराणी कपसाठी संघ
रेस्ट ऑफ इंडिया:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, सारांश जैन, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल , रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.
हेही वाचा – IND vs BAN: रविचंद्रन अश्विनच्या नावे ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेंचा ‘हा’ मोठा विक्रम मोडत ठरला नंबर वन
मुंबई:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धांत अधताराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल थवा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.