अखेरच्या चेंडूवर विजयासाठी आवश्यक असलेल्या तीन धावा करण्यात तमिळनाडूच्या मुरुगन अश्विनला अपयश आल्याने कर्नाटकने रविवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका धावेने विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मनीष पांडे (नाबाद ६०) आणि रोहन कदम (३५) या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी रचलेल्या उपयुक्त ६५ धावांच्या भागीदारीमुळे गतविजेत्या कर्नाटकने २० षटकांत ५ बाद १८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात विजय शंकर (४४) आणि बाबा अपराजित (४०) यांच्या योगदानामुळे तमिळनाडू एकवेळ सहज विजय मिळवेल, अशी चिन्हे दिसत होती. परंतु अखेरच्या षटकात तामिळनाडूला विजयासाठी १३ धावांची गरज होती. रविचंद्रन अश्विनने पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार लगावत विजय जवळ आणला. पण तिसरा चेंडू निर्धाव घातल्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने एक धाव घेत विजय शंकरला फलंदाजीवर आणले. पण २ चेंडू आणि ४ धावा असे समीकरण असताना फटकेबाजी करण्याच्या नादात दुसरी धाव काढताना शंकर धावचीत झाला. अखेर फिरकीपटू कृष्णप्पा गौतमने मुरुगन अश्विनला एका धावेवर समाधान मानण्यास भाग पाडून कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गतवर्षी महाराष्ट्राला नमवून कर्नाटकने विजेतेपदाचा चषक उंचावला होता.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक : २० षटकांत ५ बाद १८० (मनीष पांडे नाबाद ६०, रोहन कदम ३५; मुरुगन अश्विन २/३३) विजयी वि. तमिळनाडू : २० षटकांत ६ बाद १७९ (विजय शंकर ४४, बाबा अपराजित ४०; रोनित मोरे २/२२).

Story img Loader