वृत्तसंस्था, राजकोट : डावखुऱ्या यशस्वी जैस्वालच्या (४४ चेंडूंत नाबाद ६६ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर मुंबईने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात मध्य प्रदेशला ८ गडी आणि १८ चेंडू राखून पराभूत केले. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात मध्य प्रदेशने दिलेले १८२ धावांचे लक्ष्य मुंबईने १७ षटकांत गाठले. सलामीवीर पृथ्वी शॉ (१२ चेंडूंत २९) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (१७ चेंडूंत ३०) यांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर यशस्वीने सर्फराज खानच्या (१८ चेंडूंत ३०) साथीने ६२ धावांची भागीदारी रचत मुंबईला विजयासमीप नेले. सर्फराज बाद झाल्यावर यशस्वीला अमन खानची (११ चेंडूंत नाबाद २१) उत्तम साथ लाभल्याने मुंबईने सहज विजय मिळवला. यशस्वीने नाबाद ६६ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले.
तत्पूर्वी, मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८१ अशी धावसंख्या केली. चंचल राठोड (१०) आणि शुभम शर्मा (१९) लवकर बाद झाले. मात्र, नुकताच भारतीय संघात प्रवेश मिळवणारा रजत पाटीदार (३५ चेंडूंत ६७) आणि डावखुरा वेंकटेश अय्यर (३५ चेंडूंत ५७) यांच्या अर्धशतकांमुळे मध्य प्रदेशला १८० धावांचा टप्पा ओलांडता आला.
संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश : २० षटकांत ७ बाद १८१ (रजत पाटीदार ६७, वेंकटेश अय्यर ५७; तुषार देशपांडे ३/२६, शिवम दुबे १/२३) पराभूत वि. मुंबई : १७ षटकांत २ बाद १८२ (यशस्वी जैस्वाल नाबाद ६६, सर्फराज खान ३०; शुभम शर्मा १/१८)