रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील अव्वल कामगिरीनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरला पाठीच्या दुखण्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी न होत असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. त्याबरोबर आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित केल्याचे तिने सांगितले.
‘‘भविष्यातील अनेक स्पर्धाचा विचार करता मी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊन दुखापतीमध्ये वाढ करण्याची माझी इच्छा नाही. तसे झाल्यास पुढील अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धाना मुकावे लागेल. राष्ट्रकुल स्पर्धेत मला पदकाची खात्री होती; परंतु आशियाई स्पर्धेत ती कसर भरून काढेन,’’ असा विश्वास ललिताने व्यक्त केला.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात ललिताने ९ मिनिटे आणि १९.७६ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. तो राष्ट्रीय विक्रम ठरला. राष्ट्रकुल स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारातील विक्रम युगांडाच्या डोर्कस इझीकुरू (९:१९:५१सेकंद) हिच्या नावावर आहे. ललिताला यंदा हा विक्रम मोडण्याची खात्री होती.
ललिताला जानेवारीअखेरीस अडथळ्याचा सराव करताना पाठीला दुखापत झाली. सध्या ती फक्त धावण्याचा सराव करत आहे. ‘‘जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत मी सहभाग घेतला होता. तेथे मला दुसरे स्थान मिळाले आणि त्या कामगिरीच्या जोरावर आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी पात्र ठरली. या स्पर्धेत मी सहभागी होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांच्या विश्रांतीदरम्यानच्या सरावात पाठीचे दुखणे झाले. सध्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे,’’ असे तिने सांगितले.
लग्नापूर्वी आणि नंतरचे महिला खेळाडूचे आयुष्य कसे असते, याबाबत विचारले असता ललिता म्हणाली, ‘‘माझ्या आईवडिलांप्रमाणेच सासरची मंडळी चांगले सहकार्य करत आहेत. लग्नानंतर खेळामध्ये पुनरागमन करणे आव्हानात्मक आहे; पण पती आाणि सासरच्या मंडळींच्या पािठब्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. सध्या आशियाई स्पर्धेत सवरेत्कृष्ट कामगिरीचे लक्ष्य डोळय़ासमोर आहे.’’
रिओनंतर आयुष्य पालटले
‘‘रिओ ऑलिम्पिक स्पर्धा ही आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. रिओ ऑलिम्पिकनंतर देशातील क्रीडा वातावरणातही सकारात्मक बदल झाला. खेळाडू म्हणून आमचा आत्मविश्वास वाढला आणि आमच्यातील सर्वोत्तम खेळाडू घडला. टोकियोत पदकाचा रंग बदलण्याचा (सुवर्ण) प्रयत्न असेल,’’ असे मत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले.
सिंधूच्या मताशी अव्वल बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांत, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मालिक आणि ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांनी सहमती दर्शवली. त्याच वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये अविस्मरणीय कामगिरी करण्याचा निर्धार खेळाडूंनी बोलून दाखवला. ब्रिजस्टोन या कंपनीने या खेळाडूसह पाच वेळा जागतिक पदकांसह ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम यांना करारबद्ध केले. मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. या उपक्रमाला ‘चेस युअर ड्रीम’ असे नाव देण्यात आले आहे.
मागील वर्षी (२०१७) फ्रेंच, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या चार महत्वाच्या स्पर्धावर नाव कोरणारा श्रीकांत म्हणाला, ‘‘रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची मजल संस्मरणीय आहे. या स्पर्धेने मला सर्वोत्तम खेळाडू बनवले. त्यानंतर २०१७ मधील माझी कामगिरी कशी झाली हे सर्वाना माहीत आहे. रिओमधून जे काही शिकलो त्यामुळे बरीच प्रगती झाली.’’