भारतीय क्रिकेटसाठी आगामी काळ हा फार मोठय़ा अग्निपरीक्षेचा आहे. कारण ऑस्ट्रेलियासारख्या जागतिक क्रिकेटमधील ‘दादा’ राष्ट्राशी भारताला चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लिश संघाने मायदेशातील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाची लक्तरे वेशीवर टांगली. या अपयशाला मागे टाकून ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजविण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. बुधवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या पाच दिवसीय इराणी करंडक सामन्यात शेष भारत आणि रणजी विजेत्या मुंबई या दोन्ही संघांतील खेळाडूंचे आपल्या कामगिरीद्वारे निवड समितीचे लक्ष वेधणे, हेच प्रमुख उद्दिष्ट असेल.
सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरले होते. आता आगामी आव्हानाचा विचार करता सरावासाठी ही मंडळी इराणी सामन्यात चांगल्या कामगिरीच्या प्रतीक्षेत आहेत. सुरेश रैना, हरभजन सिंग, एस. श्रीशांत, रोहित शर्मा यांनी पुनरागमनाची आस धरली आहे. अजिंक्य रहाणे, मुरली विजय यांना संधीची उत्सुकता आहे. याचप्रमाणे दोन्ही संघांतील अन्य खेळाडूंनीही भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न जोपासले आहे.
सेहवागच्या नेतृत्वाखाली शेष भारताचा संघ कागदावर तरी अधिक प्रबळ वाटतो आहे. वीरूसोबत सलामीसाठी मुरली विजय किंवा शिखर धवन यापैकी एकाला संधी मिळेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तिसरा सलामीवीर म्हणून मुरलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यंदाच्या रणजी हंगामात जबरदस्त फॉर्मचे प्रदर्शन करणाऱ्या धवनला स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे. भारताचा सलामीवीर गौतम गंभीरसुद्धा इंग्लंडविरुद्ध दिमाखात फलंदाजी करू शकला नाही. या पाश्र्वभूमीवर विजय किंवा धवनसाठी ही भविष्यदायी संधी असू शकेल. तसेच दुखापतीतून सावरलेला मनोज तिवारी पुन्हा पॅड बांधून तयार आहे.
आयपीएलच्या लिलावात पुणे वॉरियर्सने चांगला भाव देऊन मुंबईच्या अभिषेक नायरला खरेदी केले. यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक ९६६ धावा आणि १९ बळी घेणाऱ्या नायरचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारत ‘अ’ संघातही समावेश करण्यात आला आहे. सोमवारी मुंबईचा कर्णधार अजित आगरकरला दुखापत झाल्यामुळे आता नेतृत्वाची धुरा नायरकडे चालून आली आहे. भारत ‘अ’ संघात दोन दिवसांनी समावेश करण्यात आलेल्या नायरसाठी आठवडय़ाभरात तिसऱ्यांदा नशिबाचा कौल मिळाला आहे.
मुंबईकडे अनुभवी सचिनशिवाय स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा ३४ वर्षीय वासिम जाफर आहे. पाच वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जाफरने भारताचे अखेरचे प्रतिनिधित्व केले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणे भारतीय संघात होता. पण त्याचेही कसोटी पदार्पणाचे स्वप्न अद्याप साकारलेले नाही. दुखापतीमुळे कसोटी पदार्पणाची संधी हुकलेला रोहित शर्माही भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
फॉर्मशी झगडणाऱ्या सचिनने यंदाच्या हंगामात चार सामन्यांत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. साखळीतील पहिल्या सामन्यात रेल्वेविरुद्ध शतक, उपांत्यपूर्व सामन्यात बडोद्याविरुद्ध शतक आणि त्यानंतर उपांत्य फेरीत पालमच्या खडतर खेळपट्टीवर सेनादलाविरुद्ध अर्धशतक साकारणारा सचिन अंतिम सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध (२२) दुर्दैवीरीत्या धावचीत झाला. आता लाडका प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होण्याकरिता सचिनला या इराणी सामन्यानिमित्त सरावाची संधी लाभली आहे.
दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघापासून दूर राहिलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. झहीर खान दुखापतीने त्रस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींत तरी तो खेळू शकणार नाही. याचप्रमाणे मुंबईचा धवल कुलकर्णी आणि शेष भारताचे शामी अहमद, ईश्वर पांडे हे युवा वेगवान गोलंदाजसुद्धा कसोटी पदार्पणासाठी आशावादी आहेत.
प्रतिस्पर्धी संघ –
मुंबई : अभिषेक नायर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, हिकेन शाह, आदित्य तरे, अंकित चव्हाण, जावेद खान, शार्दुल ठाकूर आणि विशाल दाभोळकर.
शेष भारत : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, मनोज तिवारी, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, हरभजन सिंग, एस. श्रीशांत, प्रग्यान ओझा, ईश्वर पांडे, अभिमन्यू मिथुन, अंबाती रायुडू, मोहम्मद शामी आणि जलाल सक्सेना.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.पासून
पुनरागमनाचा निर्धार
ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येतोय. माझी कामगिरी चांगली झाली तर भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविता येईल. त्यामुळे मालिकेआधी हा महत्त्वाचा माझ्यासाठी असेल. काहीतरी खास कामगिरी करून दाखविण्याची माझी इच्छा आहे.
१००वी कसोटी
१००व्या कसोटी सामन्यात खेळणे, हा फार मोठा बहुमान असतो. माझी निवड झाली व भारतीय संघासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळाली तर तेच माझ्यासाठी चांगले असेल. मी १००वी कसोटी वगैरे असा विचार करीत नाही. मी सध्या फक्त इराणी सामन्याचा विचार करीत आहे. माझी व संघाची कामगिरी उंचावणे, हेच लक्ष्य आहे.
हरभजन सिंग, शेष भारतचा फिरकीपटू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा