न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेसी रायडर याला अतिदक्षता विभागातून बाहेर हलविण्यात आले असून आपली प्रकृती आता चांगली आहे असे त्याने सांगितले. ख्राईसचर्च येथील एका बारमधून बाहेर पडत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
ख्राईसचर्च रुग्णालयात गेले तीन दिवस त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असून त्याने आपल्या चाहत्यांना आपण लवकरच बरे होऊ, असा संदेश दिला असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
रायडर याने पुढे म्हटले आहे,‘‘माझ्यावर हल्ला झाल्यानंतर असंख्य चाहत्यांनी माझ्याविषयी मंडळाकडे व रुग्णालयाच्या तज्ज्ञांकडे सतत विचारणा केली होती. माझ्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुमच्या प्रेमामुळेच मी लवकरच तंदुरुस्त होईन अशी मला खात्री आहे.’’
रायडरचे व्यवस्थापक एरॉन क्ली यांनी सांगितले,‘‘ यानंतर रायडरकडून सध्या तरी कोणतेही पत्रक काढले जाणार नाही. त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असला तरी त्याला पुरेशा विश्रांतीची आवश्यकता आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच पत्रकारांशी संवाद साधणार आहे. रायडर याच्याकडून पोलिसांनी अद्याप कोणतेही निवेदन घेतलेले नाही. तसेच आपल्यावर कसा हल्ला झाला आहे हे त्याला आठवत नाही.’’
दरम्यान, रायडर याच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून चार एप्रिल रोजी न्यायालयापुढे त्यांना हजर केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा