एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कत्तल करत साकारलेली वादळी खेळी युवराज सिंगने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केली आहे. ‘‘या खेळीने आनंद झाला की नाही, हे सांगू शकत नाही. मी चेंडू फटकावत गेलो आणि षटकार बसत गेले, याचा मनापासून आनंद आहे. मात्र त्याच वेळी सचिन निवृत्त होतोय, याचे दु:ख आहे. ही खेळी मला सचिनला समर्पित करायची आहे. दूरध्वनी करून मी कदाचित त्याला हे सांगेन. मी माझ्या परीने एवढेच करू शकतो. ही खेळी माझ्या आईला समर्पित करायला आवडेल. माझ्या पुनरागमनासाठी तिने प्रार्थना केली होती,’’ असे युवराजने सांगितले. ‘‘तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती हा भावुक क्षण आहे. त्याने क्रिकेट सोडावे, असे वाटत नाही. मी त्याला जाऊ देणार नाही. त्याचे पाय पकडून आम्ही त्याला ड्रेसिंगरूमच्या बाहेर जाऊ देणार नाही. त्याच्यासह इतकी वर्षे खेळायला मिळणे, हे आमचे भाग्य आहे. या क्षणी काय बोलावे मला सुचत नाही,’’ अशा शब्दांत युवराजने सचिनविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

Story img Loader