टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारतीय संघाने तरुण खेळाडूंना संधी दिली. या दौऱ्यात वन-डे मालिकेत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहाला एकही बळी घेता आला नाही. भारतीय संघाच्या पराभवामागचं हे प्रमुख कारण मानलं जातंय. टी-२० मालिकेत शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी यांनी चांगली कामगिरी केली,मात्र त्यासाठी त्यांनी खोऱ्याने धावा दिल्या. यानंतरही मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूर आगामी टी-२० विश्वचषकात आपल्याला स्थान मिळेल याबद्दल आशावादी आहे.
“नक्कीच, विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. माझ्या मते माझ्यातली सकारात्मकता आणि आत्मविश्वास संघाला टी-२० विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. आगामी आयपीएल आमच्यासाठी महत्वाचं असेल, या स्पर्धेतून आमचा चांगला सराव होऊ शकतो. या स्पर्धेनंतर श्रीलंका, झिम्बाब्वे आणि आशिया चषक अशा ३ स्पर्धा आमच्यासमोर आहेत.” शार्दुल मुंबईत एका खासगी कार्यक्रमात बोलत होता. आयपीएलमध्ये शार्दुल चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करतो.
न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत शार्दुलची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. याविषयी बोलताना शार्दुल म्हणाला, “होय, या चुकांमधून मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासाठी हा एक चांगला अनुभव होता. माझा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता, इतरांच्या तुलनेत मी फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळलो नाहीये. पण यामधूनही मी स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे.”