अ‍ॅथलेटिक्समध्ये मी नोंदविलेले विश्वविक्रम हे मोडले जाण्याची शक्यता कमीच आहे, असे जमैकाचा विश्वविक्रमवीर व ऑलिम्पिक विजेता युसेन बोल्ट याने सांगितले.
अ‍ॅथलेटिक्समधील सम्राट म्हणून ख्याती मिळविलेला बोल्ट हा बंगळुरूला कोणतीही धावण्याची स्पर्धा खेळायला आला नसून तो चक्क क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यासाठी आला आहे. बोल्ट व भारताचा अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या नेतृत्वाखाली येथे सेवन-अ-साइड प्रदर्शनीय क्रिकेट सामना होणार आहे. बोल्टच्या संघात भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा समावेश आहे, तर युवराजच्या संघात वेगवान गोलंदाज झहीर खानचा समावेश आहे.
पुरुष गटात १०० व २०० मीटर धावणे या दोन्ही शर्यतींमध्ये विश्वविक्रम नोंदविणारा बोल्ट हा पहिलाच खेळाडू आहे. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील ९.५८ सेकंद हा विश्वविक्रम मोडला जाईल काय, या प्रश्नाला उत्तर देताना बोल्ट म्हणाला, ‘‘हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता कमी आहे. सर्वसाधारणपणे अ‍ॅथलेटिक्समधील विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, मात्र मी केलेली कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. मैदानी स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी एकाग्रता व मनोधैर्य असण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या धावपटूंपैकी जस्टीन गॅटलीन, टायसन गे, योहान ब्लेक हे नैपुण्यवान खेळाडू आहेत. आणखीही उदयोन्मुख खेळाडू जागतिक स्तरावर चमक दाखवू लागले आहेत. मात्र माझे विश्वविक्रम मोडणे ही त्यांच्या क्षमतेपलीकडील कामगिरी असेल.’’
भारतात अ‍ॅथलेटिक्सऐवजी क्रिकेट खेळण्यासाठी येण्याचे समर्थन करीत बोल्ट म्हणाला, ‘‘माझे वडील क्रिकेटचे खूप चाहते आहेत. जेव्हा मी उच्च माध्यमिक शिक्षण घेत होतो, त्यावेळी माझ्यापुढे क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्स असे दोन पर्याय होते. माझ्या वडिलांनी दिलेला अ‍ॅथलेटिक्समध्ये करीअर करण्याचा सल्ला मी ऐकला. क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळविण्यासाठी खूपच स्पर्धा असते. त्याऐवजी धावण्यात कौशल्य दाखवले तर जागतिक स्तरावर यश मिळविता येईल असेही माझ्या वडिलांनी मला सुचविले. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू अब्राहम डी व्हिलियर्स याचा मी खूप चाहता आहे. बास्केटबॉलपटू केव्हिन गार्नेट हा माझ्यासाठी आदर्श आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा