भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे एन.रामचंद्रन, तर सरचिटणीसपदी राजीव मेहता यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीमुळे आयओएवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घातलेली बंदी उठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयओएची २०१२ मध्ये झालेली निवडणूक बेकायदेशीर ठरवित आयओसीने आयओएवर बंदी घातली होती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या संघटकांना आयओएवरुन काढून टाकण्याबाबत घटनादुरुस्ती करण्याचा व त्यानंतर निवडणूक घेण्याचा आदेश त्यांनी आयओएला दिला होता. ही प्रक्रिया पूर्ण केल्याखेरीज बंदी मागे घेतली जाणार नाही, असे आयओसीने कळविले होते. येथे झालेल्या निवडणुकीचे वेळी आयओसीचे तीन निरीक्षक तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा एक प्रतिनिधी उपस्थित
होते.
अध्यक्षपदासाठी रामचंद्रन, तर सरचिटणीसपदासाठी मेहता यांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित होती. रविवारी येथे त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचप्रमाणे खजिनदारपदी अनिल खन्ना यांचीही बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदाच्या आठ जागांकरिता नऊ उमेदवार रिंगणात होते. अखिलेश दासगुप्ता, अनुराग ठाकूर, बीरेंद्र बैश्य, जी.एस.मंदेर, जर्नादनसिंह गेहलोत, परविंदरसिंग धिंडसा, आर.के.आनंद, त्रिलोचनसिंग हे निवडून आले. मात्र एकमेव महिला उमेदवार राजलक्ष्मी सिंगदेव यांचा पराभव झाला. कार्यकारिणीवर दहा सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या नामदेव शिरगावकर यांचा समावेश आहे.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष : एन. रामचंद्रन
वरिष्ठ उपाध्यक्ष : वीरेंद्र नानावटी
उपाध्यक्ष : जनार्धन सिंग गेहलोत, बीरेंद्र प्रसाद बैश्य, अखिलेश दासगुप्ता, परमिंदर सिंग धिंडसा, तारलोचन सिंग, अनुराग ठाकूर, आर.के. आनंद, जी.एस. मंदेर. सरचिटणीस : राजीव मेहता
खजिनदार : अनिल खन्ना.
सहसचिव : कुलदीप वत्स, राजा के.एस. सिधू, राकेश गुप्ता, एस.एम.बाली, सुनैना कुमारी.
विशेष कार्यकारिणी सदस्य : अजित बॅनर्जी, अवदेश कुमार, बलबीर सिंग खुशवाहा, भुवनेश्वर कुमार कलिता, धनराज चौधरी, नामदेव शिरगावकर, राणा गुरमीत सिंग सोधी, विक्रम सिंग सिसोदिया.