आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाबाबत मुदगल समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावरील सामनानिश्चितीच्या आरोपांचे खंडन करत त्यांना ‘क्लीन चीट’ दिली आहे. तर श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा यांच्यावर सट्टेबाजीचे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्याचबरोबर त्यांची संघाबाबतची नेमकी भूमिकाही यावेळी स्पष्ट करण्यात आली. त्याबरोबर आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण हे सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तीन सदस्यीय समितीने आपल्या अहवालामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पायउतार झालेले अध्यक्ष श्रीनिवासन यांनी खेळाडूंच्या विरोधात कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या अहवालामध्ये मयप्पन यांची चेन्नई सुपर किंग्ज संघातील भूमिका स्पष्ट करण्यात आली असून ते संघाचे ‘टीम प्रिन्सिपल’ असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक कुंद्रा यांनी बीसीसीआय आणि आयपीएलच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचेही म्हटले आहे.
आयपीएलच्या नियमांनुसार जर संघांचा मालक, फ्रँचायजी किंवा मालकी हक्क असलेल्या कंपनीच्या समूहाकडून स्पर्धेच्या दर्जाला धक्का लागल्यास तो संघ बाद ठरवण्यात येऊ
शकतो.
स्पॉट-फिक्सिंग समितीचे अध्यक्ष निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मुकुल मद्गल, अॅडिशनल सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव आणि वरिष्ठ वकील निसय दत्ता यांनी आपल्या अहवालामध्ये मयप्पन सट्टेबाजीमध्ये गुंतला असल्याचे म्हटले असून, त्याचा सामना निश्चितीशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.
कुंद्रा यांच्या बाबतची सट्टेबाजीबाबतची चौकशी दिल्ली पोलिसांनी राजस्थान पोलिसांकडे सुपूर्द केली होती. ही चौकशी राजस्थान पोलिसांनी का थांबवली, असा प्रश्नही या अहवालात उपस्थित करण्यात आला आहे.
आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांचे सट्टेबाजांशी संबंध होते आणि त्यांनी या मोसमामध्ये आठ वेळा सट्टेबाजांशी संपर्क साधल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
‘‘सुंदर रमण यांनी सट्टेबाजांना ओळखत असल्याची माहिती दिली होती, पण ते सट्टेबाज असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मयप्पन आणि कुंद्रा हे सट्टेबाजीमध्ये सहभागी असल्याची माहिती आपल्याया आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथाकाने दिल्याचे मान्य केले. पण या माहितीनुसार त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नव्हते, असे रमण यांनी सांगितले,’’ असे समितीने अहवालात म्हटले आहे.
श्रीनिवासन यांच्याबाबत समितीने म्हटले आहे की, ‘‘श्रीनिवासन हे सामनानिश्चितीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये सहभागी नव्हते. त्याचबरोबर सामनानिश्चितीबाबतच्या तपासामध्ये त्यांनी कोणतीही चालढकल केली नाही. श्रीनिवासन यांच्यासह बीसीसीआयच्या चार अधिकाऱ्यांना तीन खेळाडूंनी नियमांचा भंग केल्याची माहिती मिळाली होती, पण त्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही.’’
मयप्पनबाबत अहवालात म्हटले आहे, की मयप्पन हा सामना निश्चितीमध्ये असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. पण मयप्पन हा चेन्नईच्या संघाशी अधिकृतपणे जोडला गेलेला आहे.
या अहवालातील श्रीनिवासन, मयप्पन, कुंद्रा आणि सुंदर रमण यांची नावे जाहीर करण्यात आली असून, एकाही क्रिकेटपटूचे नाव अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही.
श्रीनिवासन यांना ‘क्लीन चीट’
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाबाबत मुदगल समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावरील सामनानिश्चितीच्या आरोपांचे खंडन करत त्यांना ‘क्लीन चीट’ दिली आहे.
First published on: 17-11-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: N srinivasan gets clean chit raj kundra meiyappan indicted for illegal betting