शशांक मनोहर जागा घेण्याची शक्यता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या सत्ताकेंद्रात शशांक मनोहर यांच्या रूपाने झालेल्या बदलाचे पडसाद आता आंतराष्ट्रीय पातळीवरही उमटल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. मात्र परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्दय़ावरून अडचणीत आलेल्या श्रीनिवासन यांची आयसीसीच्या कार्याध्यक्ष पदावरूनही उचलबांगडी होण्याची चिन्हे आहेत. मनोहरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे.
दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्षपद आणि आयपीएल स्पर्धेतील संघाचे मालकत्व या दोन्ही भूमिकांमुळे श्रीनिवासन यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघटनेत स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे संकेत दिले होते. याचाच भाग म्हणून बोर्डाशी संलग्न असलेले माजी खेळाडू आणि समालोचक सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे करार संपुष्टात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक ९ नोव्हेंबरला मुंबईत होत आहे. या बैठकीत श्रीनिवासन यांच्या संदर्भात चर्चा होणार आहे. समिती सदस्यांमध्ये श्रीनिवासन यांच्याऐवजी मनोहर यांनी आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे असा सूर आहे.
बीसीसीआयने समालोचकांशी केलेले करार संपुष्टात आणावेत यावर एकमत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला समालोचक ठरवण्याचा अधिकार द्यावा, अशी समितीतील सदस्यांची भूमिका आहे.
आयसीसीमध्ये झालेल्या संघटनात्मक फेररचनेनंतर श्रीनिवासन यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. श्रीनिवासन यांच्याऐवजी मनोहर यांच्या नावाला पसंती ही केवळ औपचारिकता आहे. मनोहर आयसीसीचे कार्याध्यक्ष झाल्यास जून २०१६ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तारखांवरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे. मनोहर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास या प्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे.
विविध न्यायालयीन प्रविष्ट प्रकरणांसाठी बीसीसीआय नव्या विधि कंपनीची मदत घेणार आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधि कंपनीचा करार बीसीसीआयने मोडीत काढण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा