सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला शिरसावंद्य मानत स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे पायउतार झालेले तामिळनाडूचे उद्योगपती एन. श्रीनिवासन आपल्या अष्टप्रधान मंडळासहित रविवारी चेन्नईत होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सज्ज झाले आहेत. श्रीनिवासन यांनी दक्षिणेकडील आघाडीसहित जुळवून आणलेली राजनीती पाहता तिसऱ्या वर्षांसाठी अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे बिनविरोधपणे येणार हे आता निश्चित झाले आहे. दक्षिण विभागाकडून श्रीनिवासन यांचेच नाव अध्यक्षपदासाठी सूचित केले आहे. याच विभागाकडून त्यांचा प्रस्ताव आणि अनुमोदन मिळणार आहे.
बीसीसीआयच्या नव्या कार्यकारिणी समितीमध्ये राजकीय नेते आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख राजीव शुक्ला, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव एस. के. बन्सल या तिघांची उपाध्यक्षपदी वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे. अरुण जेटली, निरंजन शाह आणि सुधीर डबीर यांनी विविध कारणांसाठी उपाध्यक्षपदासाठी एक वर्षांचा वाढीव कार्यकाळ स्वीकारला नाही. डबीर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचे खास, तर शाह शरद पवार यांच्या मर्जीतले मानले जातात.
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर श्रीनिवासनविरोधी लाट आली असताना, अजय शिर्के यांनी कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ती पोकळी श्रीनिवासन यांनी सावंत यांच्यावर प्रभारी कोषाध्यक्षपदाची जबाबदारी टाकून भरून काढली होती. एमसीएची निवडणूक लांबवून केंद्रीय मंत्री शरद पवार यांना बीसीसीआयपासून रोखण्याची रणनीती आखणाऱ्या सावंत यांना त्यामुळेच उपाध्यक्षपदाचे इनाम वाटय़ाला आले आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अनुभवी प्रशासक शाह यांची ते जागा घेतील.
आयपीएलच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणारे शुक्ला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या डबीर यांच्या जागी मध्य विभागातून उपाध्यक्षपदी रुजू होतील. भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या दृष्टीने २०१४मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक महत्त्वाची आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या दिल्लीमधील बन्सल यांची उत्तर विभागाकडून उपाध्यक्षपदासाठी वर्णी लावण्यात आली आहे.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे ज्येष्ठ पदाधिकारी चित्रक मित्रा तसेच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारताचे माजी ऑफ स्पिनर शिवलाल यादव उपाध्यक्षपदाचा एका वर्षांचा वाढीव कार्यकाळ मिळवणार आहेत.
बडोद्याचे संजय पटेल यांना अधिकृतपणे बीसीसीआयच्या सचिवपदाची जबादारी सोपवण्यात येईल. आयपीएल प्रकरणानंतर संजय जगदाळे यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावरून सचिवपदाचा त्याग केल्यानंतर प्रभारी सचिवपद पटेल यांनी इमानेइतबारे सांभाळले होते. अनुराग ठाकूर संयुक्त सचिवपदावर कायम राहतील. याचप्रमाणे कोषाध्यक्षपदावर हरयाणा क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अनिरुद्ध चौधरी यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे.
प्रभारी अध्यक्षपद पुन्हा दालमिया यांच्याकडेच
बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना श्रीनिवासन यांना वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर राहण्याचा आणि निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा केला, परंतु स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत श्रीनिवासन पदभार स्वीकारू शकणार नाहीत. या पाश्र्वभूमीवर दालमिया यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते. परंतु दालमिया यांना स्वाक्षरी करण्याचा अधिकार मिळू शकणार नाही. संजय पटेल जर सचिवपदावर नियुक्त झाले, तर श्रीनिवासन यांना हिरवा कंदील मिळेपर्यंते पटेल कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकतील.
आयपीएलचे प्रमुखपद दालमियांकडे येण्याची शक्यता
रविवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आर्थिक खाण मानल्या जाणाऱ्या आणि सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयपीएलचे प्रमुखपद हे महत्त्वाचे ठरणार आहे. या पदासाठी जगमोहन दालमिया यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयची संभाव्य कार्यकारिणी
अध्यक्ष : एन. श्रीनिवासन
उपाध्यक्ष : रवी सावंत (पश्चिम)
राजीव शुक्ला (मध्य)
एस. के. बन्सल (उत्तर)
शिवलाल यादव (दक्षिण)
चित्रक मित्रा (पूर्व)
सचिव : संजय पटेल
संयुक्त सचिव : अनुराग ठाकूर
कोषाध्यक्ष : अनिरुद्ध चौधरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा