भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांचा अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रीनिवासन यांनी घेतली अरुण जेटलींची भेट
बिहार क्रिकेट संघटनेने श्रीनिवासन यांना आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यापासून रोखण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.एस.खेहर आणि सी.नागापन्न यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
आयपीएल गैरकारासंदर्भातील प्रकरणामुळे आणि चौकशी समितीने सादर केलेल्या १३ जणांच्या यादीत श्रीनिवासन यांचेही नाव असल्याने त्यांना बीसीसीआय पासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यानुसार चौकशी होईपर्यंत आयसीसीमध्येही श्रीनिवासन यांचा सहभाग नसावा असा प्रतिवाद न्यायाधीशांसमोर करण्यात आला होता परंतु, याला असहमती दर्शवत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.