भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याभोवतीचा वादांचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना अन्य पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा राबवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, लंडनस्थित गुप्तहेर यंत्रणेला हे काम सोपवण्यात आले होते आणि त्यासाठी बीसीसीआयचा निधी वापरल्याचे उघड झाले आहे.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी आणि ई-मेल हॅक करण्यासाठी बीसीसीआयचे तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

फेब्रुवारी २०१४ मध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती मुदगल यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे ट्विट आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी केले होते. ‘‘एखाद्या थरारपटाप्रमाणे हा प्रकार आहे. लंडनमधील एका नामांकित गुप्तहेर कंपनीची माणसे मुदगल यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. या कंपनीचे माझ्यावरही लक्ष आहे. असा प्रकार घडू शकतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. यामागे कोण माणसे आहेत, याचा शोध घेण्याविषयी माझ्या वकिलांशी चर्चा केली. मात्र हा सगळा प्रकार चित्रपटाला साजेसा आहे,’’ असे मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले होते.

आता दोन वर्षांनंतर हे प्रकरण समोर आल्याने श्रीनिवासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक हितसंबंधांप्रकरणी दोषी आढळू नये यासाठी श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्स संघाची मालकी स्वत:च्याच कंपनीला अवघ्या पाच लाखांत विकली.

प्रत्यक्षात चेन्नई सुपरकिंग्स संघाची मालकी काही हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र संघाची मालकी बदलल्यानंतर बीसीसीआयला हस्तांतरण शुल्क द्यावे लागते. मात्र पाच लाखांत संघ विकल्याने श्रीनिवासन यांनी केवळ २५,००० रुपये शुल्क म्हणून द्यावे लागेल. संघमालकीच्या तांत्रिक बदलाला आयपीएलच्या प्रशासकीय समितीने मान्यता दिली नाही.

दरम्यान, या प्रकरणात आकडय़ांच्या प्रचंड अफरातफरीची शक्यता लक्षात घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती मागवली आहे. संचालनालय या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची शहानिशा करणार आहे.

Story img Loader