Shahrukh Khan compares himself to MS Dhoni Video Viral : बीसीसीआने आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन्शनचे नियम जाहीर करताच, एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळू शकतो याची पुष्टी झाली आहे. एक अनकॅप्ड भारतीय म्हणून, त्याला आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी रिटेने करता येईल आणि चेन्नई सुपर किंग्ज त्याला ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन करु शकेल. धोनीच्या आयपीएलमधील भवितव्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानने एका कार्यक्रमात धोनीशी स्वत:ची तुलना करताना एक मजेशीर वक्तव्य केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खरं तर, अलीकडेच एका अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने चित्रपट निर्माता करण जोहरची खिल्ली उडवली आणि त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. यावर करण जोहरने त्याला विचारले की तुम्ही कधी निवृत्ती घेणार आहात? यावर शाहरुख खानने म्हणाला की, तो आणि धोनी हे वेगळ्या प्रकारचे दिग्गज आहेत, जे नाही..नाही म्हणत असूनही १० वर्षे आयपीएल खेळतात.
शाहरुख खानने धोनीशी केली स्वत:ची तुलना –
अभिनेता शाहरुख खान पुढे म्हणाला, “दिग्गजांची सर्वात मोठी खासियत म्हणजे दिग्गजांना कधी थांबायचे आणि कधी निवृत्ती घ्यायची हे माहित असते. जसे की महान सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री आणि दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर या सर्वांना माहित आहे की कधी निवृत्ती घ्यायची आहे, त्याचप्रमाणे मला वाटते की आता तुमची ती वेळ आली आहे. त्यामुळे तुम्ही परत जा, तुमचे खूप खूप धन्यवाद.”
करण जोहर यावर प्रतिक्रिया देत म्हणतो की, तुम्ही त्या मानकांनुसार आणि त्यानुसार निवृत्ती का घेत नाही? यावर शाहरुख खानने उत्तर दिले, “खरं तर, मी दुसऱ्या प्रकारचा लीजेंड आहे. धोनी आणि मी एकाच प्रकारचे दिग्गज आहोत. नाही…नाही म्हणत आम्ही १० आयपीएल खेळतो.” शाहरुखच्या या उत्तरावर सर्व प्रेक्षक हसू लागले. यानंतर विकी कौशल म्हणतो, “निवृत्ती महान लोकांसाठी असते, राजे सदैव असतात.”