55 Cricketers Tested by NADA in Five Months: नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा) च्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तीनदा डोप चाचणीसाठी आपले नमुने दिले आहेत. त्यामुळे या कालावधीत क्रिकेटपटूने केलेल्या सर्वाधिक चाचण्या बनल्या आहेत. नाडाच्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या ताज्या यादीनुसार, वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत एकूण ५५ क्रिकेटपटूंची (पुरुष आणि महिला, 58 नमुने) डोप चाचणी करण्यात आली. यातील बहुतांश नमुने स्पर्धेबाहेर घेण्यात आले. याचा अर्थ या वर्षी क्रिकेटपटूंकडून गोळा केलेल्या नमुन्यांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत खूप जास्त असण्याची शक्यता आहे.
आकडेवारीनुसार, नाडाने २०२१ मध्ये ५४ आणि २०२२ मध्ये ६० क्रिकेटपटूंचे नमुने घेतले होते. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांची वर्ष २०२३ च्या पहिल्या पाच महिन्यांत चाचणी झाली नाही. गेल्या काही काळापासून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पांड्याचा एप्रिलमध्ये स्पर्धाबाह्य लघवीचा नमुना घेण्यात आला होता. २०२१ आणि २०२२ मध्ये रोहितची सर्वाधिक वेळा चाचणी झाली होती. या दोन्ही वर्षांत नाडाच्या आकडेवारीनुसार रोहितची ३-३ वेळा चाचणी झाली होती.
२०२१ आणि २०२२ मध्येही कोहलीची झाली नव्हती चाचणी –
२०२१ आणि २०२२ मध्येही कोहलीची चाचणी झाली नव्हती. २०२२ मध्ये महिला क्रिकेटपटूंचे सुमारे २० नमुने घेण्यात आले होते, परंतु यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना या दोनच महिला क्रिकेटपटूंची एकदाच स्पर्धेबाहेर चाचणी घेण्यात आली. या दोघींच्या लघवीचे नमुने १२ जानेवारीला मुंबईत घेण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान एकूण २० नमुने घेण्यात आले असून यातील बहुतांश नमुने इंडियन प्रीमियर लीगदरम्यान घेतले गेले असावेत.
हेही वाचा – विश्वचषकासाठी तिलकही पर्याय -अश्विन
जडेजाचे तीनही नमुने लघवीचे घेतले गेले –
क्रिकेटपटूंच्या एकूण ५८ नमुन्यांपैकी सात नमुने रक्ताचे तर उर्वरित लघवीचे नमुने आहेत. जडेजाचे तीनही नमुने लघवीसाठी घेतले गेले. हे नमुने १९ फेब्रुवारी, २६ मार्च आणि २६ एप्रिल रोजी घेण्यात आले. वेगवान गोलंदाज टी नटराजनचे २७ एप्रिल रोजी दोन नमुने घेण्यात आले होते. यामध्ये रक्त आणि लघवीच्या नमुन्याचा समावेश आहे. अतिरिक्त पदार्थ तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घेतला जातो. लघवीच्या नमुन्यांमध्ये हे पदार्थ आढळून येत नाहीत.
या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत डोप चाचणी केलेल्या इतर प्रमुख भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, मोहम्मद सिराज, दीपक चहर, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, यशस्वी जैस्वाल, अंबाती रायुडू, पियुष चावला आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे.
हेही वाचा – NOR vs SOM: पृथ्वी शॉने १२९ चेंडूत झळकावले द्विशतक, लिस्ट ए क्रिकेटमध्ये लावली विक्रमांची रांग
या सर्वांव्यतिरिक्त, आयपीएल हंगामात काही परदेशी खेळाडूंचीही चाचणी घेण्यात आली, ज्यात आंद्रे रसेल, डेव्हिड विली, ट्रेंट बोल्ट, मार्कस स्टॉइनिस, मार्क वुड, अॅडम झाम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, सॅम करन, डेव्हिड वॉर्नर, सुनील नरेन, कॅमेरून ग्रीन, डेव्हिड विसे आणि रशीद खान यांचा समावेश आहे.