नवी दिल्ली : उत्तेजक सेवन चाचणीसंदर्भात ठावठिकाणा कळवण्याच्या नियमाचा भंग केल्यामुळे भारताची वेगवान धावपटू हिमा दासवर लादलेली १६ महिन्यांची बंदी उठविण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) घेतला असला, तरी त्यामुळे वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे.
हिमावर २२ जुलै २०२३ रोजी बंदी आणली होती. ही बंदी नियमानुसार २१ नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाली असल्यामुळे हिमा आता स्पर्धेत सहभाग घेऊ शकते, असे ‘नाडा’ने जाहीर केले. प्रत्यक्षात ही बंदी उठण्यापूर्वीच हिमा जून महिन्यात तब्बल चार स्पर्धेत सहभागी झाली होती. या संदर्भात बोलण्यास हिमाने नकार दिला, तर भारतीय अॅथलेटिक्स महासंघानेही तिच्यावरील बंदी नोव्हेंबरमध्येच पूर्ण झाल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
निलंबनाची कारवाई करताना खेळाडू आणि ‘नाडा’ यांच्याकडून करारावर स्वाक्षरी करण्यात येतात. यात खेळाडू या कालावधीत कुठल्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही ही अट असते. पण, यानंतरही हिमा जून महिन्यात स्पर्धेत कशी सहभागी झाली याविषयी गोंधळच आहे. शिस्तपालन समितीने हिमाकडून कुठलीही चूक झाली नसल्याचा निर्णय दिला आहे, मात्र हा निर्णय कशाच्या आधारे घेण्यात आला हे ‘नाडा’ने स्पष्ट केलेले नाही.