लाल मातीवरचे आठवे विक्रमी जेतेपद पटकावण्यासाठी आसुललेल्या राफेल नदालने स्टॅनिलॉस वॉरविन्काचा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या लढतीत नोव्हाक जोकोव्हिचने टॉमी हासचा प्रतिकार मोडून काढत उपांत्य फेरीत आगेकूच केली. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत नदाल आणि जोकोव्हिच हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकणार आहेत.
महिलांमध्ये फ्रेंच जेतेपदावर पहिल्यांदा वर्चस्व प्राप्त करण्यासाठी उत्सुक व्हिक्टोरिया अझारेन्का आणि जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मारिया शारापोव्हाने विजयी घोडदौड करीत उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत शारापोव्हासमोर अझारेन्काचे आव्हान असणार आहे.
तृतीय मानांकित नदालने स्वित्र्झलडच्या नवव्या मानांकित स्टॅनिलॉस वॉरविन्काला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. ताकदवान सव्‍‌र्हिस, फोरहँड, बॅकहँड, ड्रॉप या सगळ्या फटक्यांचा प्रभावी उपयोग करत नदालने वॉरविन्काला ६-२, ६-३, ६-१ असे नमवले.
अव्वल मानांकित जोकोव्हिचने विजय मिळवला मात्र त्यासाठी त्याला जर्मनीच्या बाराव्या मानांकित टॉमी हासचा प्रतिकार मोडून काढावा लागला. जोकोव्हिचने हा सामना ६-३, ७-६ (५), ७-५ असा जिंकला. जोकोव्हिचने पहिला सेट सहजपणे नावावर केला. मात्र त्यानंतर हासने त्याला जोरदार टक्कर दिली. टायब्रेकरमध्ये गेलेल्या दुसऱ्या सेटमध्ये अखेर जोकोव्हिचने बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्येही मुकाबला चुरशीचा झाला मात्र जोकोव्हिचने सारा अनुभव पणाला लावत विजय साकारला.
महिलांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तृतीय मानांकित बेलारुसच्या अझारेन्काने बाराव्या मानांकित रशियाच्या मारिया किरलेन्कोला ७-६(३), ६-२ अशी मात केली. दुहेरी प्रकारात एकत्र खेळणाऱ्या आणि एकमेकांच्या मैत्रीण असलेल्या या दोघींमधील मुकाबल्यात पहिल्या सेटमध्ये किरलेन्कोने अझारेन्काला जोरदार टक्कर दिली. मात्र टायब्रेकरमध्ये अझारेन्काने सरशी साधली. पहिल्यांदाच फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या अझारेन्काने दुसऱ्या सेटमध्ये मात्र वर्चस्व सिद्ध केले.
उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लढतीत द्वितीय मानांकित शारापोव्हाने कट्टर प्रतिस्पर्धी सर्बियाच्या जेलेना जान्कोविचवर ०-६, ६-४, ६-३ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. जान्कोविचने पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाचा धुव्वा उडवला. २० चुका शारापोव्हाला महागात पडल्या. त्यावेळी जान्कोविच सनसनाटी विजय मिळवणार असे चित्र होते. मात्र शारापोव्हाने पुढच्या दोन सेट्समध्ये जान्कोविचला निष्प्रभ केले. हळूहळू लय गवसलेल्या शारापोव्हाने जोरदार रॅली, अचूक सव्‍‌र्हिस याच्या बळावर क्ले कोर्टवरील जान्कोविचविरुद्धच्या पहिल्याच मुकाबल्यात विजय साकारला.

Story img Loader