लाल मातीवरचा मुकाबला आता खऱ्या अर्थाने रंगू लागला आहे. चिवट खेळासाठी प्रसिद्ध अँडी मरे ‘लाल मातीचा बादशहा’ असलेल्या राफेल नदालचे संस्थान खालसा करण्यासाठी सज्ज झाला आहे. राफेल नदालने जिवलग मित्र डेव्हिड फेररवर ४-६, ६-४, ६-०, ६-१ अशी मात केली, तर अँडी मरेने फ्रान्सच्या गेइल मॉनफिल्सवर ६-४, ६-१, ४-६, १-६, ६-० असा संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
डेव्हिड फेररने पहिल्या सेटमध्ये फोरहँडच्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर सरशी साधली. सावध सुरुवात करणाऱ्या नदालला स्थिरावण्यासाठी वेळ लागला आणि याचा पुरेपूर फायदा उठवत फेररने तुफानी आक्रमण केले. नदालला नमवत फेरर इतिहास घडवणार असे चित्र होते, मात्र पहिला सेट गमावलेल्या नदालने त्वेषाने खेळ करत फेररला कडवी टक्कर दिली. दमदार सव्र्हिस, अफलातून बॅकहँड आणि प्रदीर्घ रॅलीवर भर देत नदालने दुसरा सेट जिंकत बरोबरी केली. यानंतरच्या दोन सेटमध्ये नदालच्या झंझावातासमोर फेरर निष्प्रभ ठरला. तिसऱ्या सेटमध्ये नदालने फेररला एकही गुण मिळू दिला नाही तर चौथ्या सेटमध्ये केवळ एका गुणावर त्याला समाधान मानावे लागले. काही दिवसांपूर्वी झालेल्या रोम मास्टर्स स्पर्धेत फेररने नदालला नमवण्याची किमया केली होती. मात्र फ्रेंच खुल्या स्पर्धेत नदालच्या साम्राज्याला तो धक्का पोहोचवू शकला नाही. या विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या नदालने नवव्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांची ग्रँडस्लॅम जेतेपदांवरची सद्दी मोडत अँडी मरेने विम्बल्डन जेतेपदाची कमाई केली. मात्र त्यानंतर त्याला असे यश मिळवता आलेले नाही. उपांत्यपूर्व फेरीतही स्थानिक खेळाडू मॉनफिल्सविरुद्ध मरेला संघर्ष करावा लागला. पहिले दोन सेट नावावर करत मरेने विजयाचा पाया रचला. मात्र यानंतर एकाग्रता गमावलेल्या मरेने भरपूर चुका केल्या. मॉनफिल्सने अचूक सव्र्हिसवर भर देत दोन सेट जिंकले. २-२ अशी बरोबरी झाल्याने मरेवरील दडपण वाढले. फेडररपाठोपाठ मरेलाही गाशा गुंडाळावा लागणार असे चित्र होते. मात्र पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मरेने दिमाखदार खेळ करत मॉनफिल्सचा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत आगेकूच केली.
तीन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत उपांत्य फेरीतच मरेला नदालविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. क्ले कोर्टवर मरेला नदालवर एकही विजय मिळवता आलेला नाही. मात्र गेल्या महिन्यात रोम मास्टर्स स्पर्धेत नदालविरुद्ध खेळताना त्याने एक सेटजिंकला होता. मात्र इतिहास बाजूला ठेवून नवा पराक्रम घडवण्याची संधी मरेला आहे. दुसरीकडे फ्रेंच खुल्या स्पर्धेकतला नदालचा दबदबा वाढतच चालला आहे. फेररवर विजयासह नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेत ६४ लढतीत विजय मिळवला आहे आणि केवळ एका लढतीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशक्यप्राय वाटणारे हे आकडे भेदण्याचे खडतर आव्हान मरेसमोर आहे.
ग्रोइनफेल्ड-ज्युलियन रोजर अजिंक्य
अना-लेना ग्रोइनफेल्ड आणि जिन ज्युलियन रोजर जोडीने फ्रेंच खुल्या स्पर्धेत ज्युलिआ जॉर्जस आणि नेनाद झेम्नोझिक जोडीवर ४-६, ६-२ (१०-७) असा विजय मिळवत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले.