मातीचा बादशहा अशी बिरुदावली लाभलेल्या राफेल नदालला यंदा मात्र क्ले कोर्टवरील स्पर्धामध्ये प्रत्येक विजयासाठी झुंजावे लागत आहे. रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नदालने संघर्षपूर्ण विजय मिळवला. नदालने फ्रान्सच्या जिल्स सिमोनवर ७-६ (१), ६-७(४), ६-२ असा विजय मिळवला. १३ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या नदालला यंदाच्या हंगामात क्ले कोर्टवर केवळ तीनच जेतेपदे पटकावता आली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या माद्रिद खुल्या स्पर्धेत नदालने जेतेपदाची कमाई केली. मात्र या लढतीत त्याचा प्रतिस्पर्धी जपानच्या केई निशिकोरीला दुखापतीमुळे माघार घेतल्याने नदालला विजयी घोषित करण्यात आले. दरम्यान या लढतीत निशिकोरीने पहिला सेट गमावला होता. या लढतीतही सिमोनने प्रत्येक गुणासाठी नदालला तंगवले. अन्य लढतीत अँडी मरेने मार्केल ग्रॅनोलर्सवर ६-२, ७-५ अशी मात केली. गेल्यावर्षी ग्रॅनोलर्सविरुद्ध पाठीचे दुखणे बळावल्यामुळे मरेला माघार घ्यावी लागली होती. या सक्तीच्या पराभवाचा बदला घेत मरेने विजय मिळवला. जर्मनीच्या अनुभवी टॉमी हासने स्वित्सर्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला ५-७, ६-२, ६-३ असे नमवले. २००२ नंतर पहिल्यांदाच हासने या स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये प्रवेश केला. महिलांमध्ये द्वितीय मानांकित चीनच्या लि नाने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरचा ६-३, ६-१ असा पराभव केला.
सानिया-कॅरा उपांत्यपूर्व फेरीत
रोम : रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक जोडीने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पाचव्या मानांकित सानिया-कॅरा जोडीने डॅनियला हन्तुचोव्हा-मिरजाना ल्युकिक बारोनी जोडीवर ६-३, ६-४ अशी मात केली. दरम्यान, रोहन बोपण्णा आणि ऐसाम उल हक कुरेशी जोडीचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. माइक आणि बॉब ब्रायन जोडीने बिगरमानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीवर ७-५, ६-१ असा विजय मिळवला.