न्यूयॉर्कमधील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या कोर्टवर नदालशाहीचा आवाज घुमला. गेला आठवडाभर नदालशाहीच्या झंझावातासमोर एकेक मोहरे निष्प्रभ ठरत होते. सोमवारी झालेली अंतिम लढतही त्याला अपवाद ठरू शकली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला हरवत राफेल नदालने विजेतेपदावर नाव कोरले.
नदालने ६-२, ३-६, ६-४, ६-१ अशा फरकाने आपला विजय साजरा करत अमेरिकन खुल्या स्पर्धेचे दुसरे विजेतेपद प्राप्त केले. याआधी २०१०मध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती. हे जेतेपद नदालच्या कारकिर्दीतले १३वे ग्रँड स्लॅम आहे. यंदाच्या हंगामात नदालची कामगिरी ६०-३ अशी अचंबित करणारी आहे. फेब्रुवारीत दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर नदालने दहा स्पर्धाची विजेतेपदे नावावर केली आहेत, तर हार्ड कोर्टवर खेळलेल्या २२ लढतींमध्ये त्याने विजय मिळवला आहे. ही आकडेवारी नदालशाहीची हुकमत सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.
गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे जवळपास वर्षभर नदाल टेनिस कोर्टपासून दूर होता. या काळात फेडररच्या फॉर्मला लागलेली ओहोटी कायम होती. मात्र जोकोव्हिच आणि अँडी मरे यांनी आपल्या विजयांचा परीघ विस्तारला होता. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत नदाल पूर्वीच्या ऊर्जेसह परतेल का, याविषयी सर्वानाच उत्सुकता होती. त्याच्या लांबणाऱ्या पुनरागमनामुळे या चर्चाचे अफवांमध्येही रूपांतर होत होते. मात्र बाह्य़ जगातील या घडामोडींचा अजिबात परिणाम होऊ न देता नदालने दणक्यात पुनरागमन केले. अफाट ऊर्जा, जबरदस्त त्वेष आणि ताकदवान सव्‍‌र्हिस या बळावर परतलेल्या नदालचा विजयरथ रोखणे प्रतिस्पध्र्यासाठी मोठे आव्हान होते. नव्या दमाने परतलेल्या नदालने अमेरिकन खुल्या स्पर्धेत समोर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सहजपणे नमवले आणि जेतेपदाचे खरे हक्कदार आपणच असल्याचे सिद्ध केले.
कोर्टवरचा सर्वागीण वावर, नेटजवळून केलेला शैलीदार कलात्मक खेळ, प्रदीर्घ रॅलीज, दिमाखदार सव्‍‌र्हिस ही महामुकाबल्याची गुणवैशिष्टय़े ठरली. शेवटच्या १३ पैकी जोकोव्हिचने ११ गुण गमावले, याव्यतिरिक्त त्याच्या हातून ५३ टाळता येण्याजोग्या चुका झाल्या. उत्साह आणि सळसळत्या ऊर्जेसह खेळणाऱ्या नदालच्या तुलनेत जोकोव्हिचच्या हालचाली संथ आणि मंदावलेल्या जाणवत होत्या.
पहिल्या सेटमध्ये नदालने २-१ अशी आघाडी घेतली. जोकोव्हिचच्या संथ खेळाचा फायदा उठवत त्याने ही आघाडी ५-२ अशी केली. या भक्कम आघाडीच्या जोरावरच त्याने पहिला सेट जिंकला. पहिला सेट गमावण्याच्या दणक्यातून सावरलेल्या जोकोव्हिचने दुसऱ्या सेटमध्ये आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ४-२ आघाडी घेतली. यानंतर नदालची सव्‍‌र्हिस भेदत जोकोव्हिचने सरशी साधली. मॅरेथॉन रॅलीमध्ये नदालने परतण्याचा प्रयत्न केला, मात्र जोकोव्हिचने त्याला निरुत्तर करत दुसरा सेट ६-३ असा जिंकला.
तासभर चाललेल्या दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने विजय मिळवला, मात्र त्याची चांगलीच दमछाक झाली. याचा पुरेपूर फायदा उठवत नदालने तिसरा सेट नावावर केला. सामन्यातील आव्हान जिवंत राखण्यासाठी जोकोव्हिचला चौथा सेट जिंकणे क्रमप्राप्त होते. मात्र जेतेपदाच्या दडपणामुळे खेळातील त्याच्या चुकांचे प्रमाण वाढले आणि नदालने चौथ्या सेटसह जेतेपदावर कब्जा केला.

प्रवास
पहिली फेरी    रायन हॅरिसन                   ६-४, ६-२, ६-२
दुसरी फेरी      रॉजेरिओ डुट्रा डा सिल्व्हा  ६-२, ६-१, ६-०
तिसरी फेरी    इव्हान डोडिग                   ६-४, ६-३, ६-३
चौथी फेरी      फिलीप कोहलश्रायबर       ६-७ (४-७), ६-४, ६-३, ६-१
उपांत्यपूर्व फेरी      टॉमी रॉब्रेडो              ६-०, ६-२, ६-२
उपांत्य फेरी      रिचर्ड गॅस्क्वेट              ६-४, ७-६ (७-१), ६-२
अंतिम फेरी      नोव्हाक जोकोव्हिच      ६-२, ३-६, ६-४, ६-१

‘‘हा क्षण खूपच भावनिक आहे. हे जेतेपद माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याची माझ्या संघातील सहकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे. नोव्हाकविरुद्ध तुमची सर्वोत्तम कसोटी लागते. तो एक अफलातून खेळाडू आहे. टेनिसमधील दिग्गज खेळाडूंमध्ये त्याची नोंद होईल!’’
-राफेल नदाल