ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील अंतिम लढतीत पराभूत होणाऱ्या राफेल नदालने रिओ खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. त्याने स्पेनच्या डॅनियल गिमेनो ट्रेव्हरचा ६-३, ७-५ असा पराभव केला.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील अंतिम लढतीत स्विस खेळाडू स्टॅनिस्लास वॉवरिन्कने नदालवर सनसनाटी मात केली होती. त्यानंतर नदालने पाठीच्या दुखण्यामुळे ब्यूनस आयर्स येथील स्पर्धेतून माघार घेतली होती. रिओ येथील स्पध्रेत सहभागी होत त्याने आपल्या कारकीर्दीतील ८००व्या सामन्यात खेळण्याचा मान मिळवला. कारकीर्दीत ८०० किंवा त्यापेक्षा जास्त एटीपी सामने खेळणारा तो सातवा खेळाडू आहे. यापूर्वी रॉजर फेडरर, लिटन ह्य़ुइट, टॉमी हास, डेव्हिड फेरर व निकोलाय डेव्हिडेन्को यांनी ही कामगिरी केली आहे.
नदालला आपलाच सहकारी अलबर्ट मोन्टानेस याच्याशी खेळावे लागणार आहे. अलबर्टने डच खेळाडू रॉबिन हासला ६-१, ७-६ (७-४) असे पराभूत केले. डेव्हिड फेररने आव्हान राखताना फ्रान्सच्या जेरेमी चार्डीला ६-२, ६-३ असे हरविले.