आशिय चषक स्पर्धेत बांगलादेशला नमवल्यानंतर श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटर चामिका करुणारत्ने याने नागीण डान्स केला होता. चामिकाच्या या डान्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, हा नागीण डान्स नेमका कुठून आला? बांगलादेश आणि श्रीलंकेविरोधातील सामन्यात चामिकाने केलेल्या डान्सचा संदर्भ काय? या डान्सशी नझमुल इस्लाम अपू आणि डॅरेन सामी यांचा काय संबंध आहे? या प्रश्नांचा आढावा घेणारे हे विश्लेषण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या डान्सचे मूळ २०१६ मध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यामध्ये आहे. बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू नझमुल इस्लाम अपू ‘बीपीएल’(BPL) लीगच्या ‘राजशाही किंग्ज’ या संघाकडून खेळत होता. यादरम्यान नझमुलने हात उंचावून मोठ्या उत्साहात नागीण डान्स केला. कर्णधार डॅरेन सॅमीनेही नझमुलच्या आनंदात सहभागी होत नागीण डान्स केला. तेव्हापासून हा डान्स क्रिकेट जगतात प्रसिद्ध झाला.

SL vs BAN Viral Video: श्रीलंकेच्या विजयापेक्षा खेळाडूंच्या ‘नागीण डान्स’चीच जास्त हवा; ‘हे’ कारणही आहे खास

“सामन्यादरम्यान जेव्हा मी हा डान्स करत होतो तेव्हा सुरवातीला सॅमीने घाबरण्याचे नाटक केले होते. हा डान्स खूप मजेदार आहे. २०१६ सालानंतर प्रत्येक सामन्यातील विजय साजरा करताना हा नागीण डान्स माझ्यासाठी ट्रेडमार्क बनला आहे”, अशी प्रतिक्रिया यावर बोलताना नझमुलने २०१७ मध्ये दिली होती. त्यानंतर आशिया चषकात नुकत्याच झालेल्या बांगलादेश-श्रीलंका सामन्यातील विजयानंतर चामिका करुणारत्ने या डान्सवर थिरकताना दिसला.

बांगलादेश-श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील खेळाडू नागीण डान्सवर का थिरकतात?

बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू नझमुल इस्लाम अपू ‘बीपीएल’ लीगमधील एक लोकप्रिय खेळाडू आहे. ड्रेसिंग रुममध्ये बिनधास्त अवतारात वावरणाऱ्या नझमुलचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशकडून टी-२० संघात नझमुलने पदार्पण केले होते. या सामन्यात श्रीलंकेच्या चार खेळाडूंना बाद केल्यानंतर नझमुलने केलेला नागीण डान्स आजही क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.

श्रीलंकेच्या खेळाडूंशी नागीण डान्सचा संबंध काय?

फेब्रुवारी २०१८ रोजी सिल्हेटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यादरम्यान बांगलादेशला डिवचण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी देखील नागीण डान्स केला होता. या सामन्यात गुनाथिलाकाने शेवटच्या षटकामध्ये दोन बळी घेत श्रीलंकेला विजय मिळवून दिला होता. अबू सईदला बाद केल्यानंतर नागीण डान्स करत गुनाथिलाकाने विजयाचा आनंद साजरा केला होता.

नागीण डान्सचा प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्यासाठी उपयोग?

मार्च २०१८ मध्ये बांगलादेशचा संघ ‘निदाहास’ स्पर्धेसाठी श्रीलंका दौऱ्यावर होता. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात २१५ धावांचा पाठलाग करत बांगलादेशने श्रीलंकेविरोधात विजय नोंदवला होता. या सामन्यात रहिमने ३५ चेंडूंमध्ये नाबाद ७२ धावा केल्या होत्या. या दमदार कामगिरीनंतर नागीण डान्स करत रहिमने विजयाचा आनंद साजरा केला. रसेल अरनोल्ड यांच्या यूट्यूब चॅनेलवर तमिल इक्बाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “या डान्ससाठी मुशफिकुर रहिमला दोषी ठरवता येणार नाही. श्रीलंकेने बांगलादेशमध्ये टी-२० स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यानंतर दनुष्का गुनाथालिकाने पहिल्यांदा हा डान्स केला होता. त्यानंतर अनेक खेळाडूंनी पुढे हाच कित्ता गिरवला आहे”, असे इक्बाल यांनी म्हटले होते.

‘निदाहास’ ट्रॉफीतील ‘त्या’ सामन्यानंतर बांगलादेश-श्रीलंका कट्टर प्रतिस्पर्धी बनले

१६ मार्च २०१८ रोजी खेळल्या गेलेल्या चुरशीच्या सामन्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका कट्टर प्रतिस्पर्धी बनले. या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. उन्मादी आनंद साजरा करताना बांगलादेश संघाच्या ड्रेसिंग रुमचा दरवाजा तोडण्यात आला होता. या घटनेची पुढे चौकशी करण्यात आली. काही खेळाडूंना शिक्षेला देखील सामोरे जावे लागले होते.   

बांगलादेशला शेवटच्या पाच चेंडूत १२ धावा जिंकण्यासाठी आवश्यक असताना नुरुल हसन आणि श्रीलंकेच्या थिसारा परेरामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. या सामन्यादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांची पंच लिंडन हनिबल यांच्याशीही वादावादी झाली होती. या सामन्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी बनले आहेत. भारत-पाकिस्तान प्रमाणेच या देशांच्या क्रिकेट सामन्यांची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagin dance origin popularity between shrilanka and bangladesh explained rvs
Show comments