पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील परिस्थिती सध्या सामान्य होताना दिसत नाही. यावर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या दोन्ही संघांमधील सामन्यावर पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आयसीसी विश्वचषक २०२३चे वेळापत्रक इंडियन प्रीमियर लीग २०२३ नंतर जाहीर केले जाणार आहे, परंतु त्यापूर्वीचे अहवाल असा दावा करत आहेत की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक २०२३ मधील सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यावर नजम सेठी म्हणाले की, “हा सामना कोलकाता किंवा चेन्नईत झाला असता तर काही मार्ग निघाला असता.”
इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना नजम सेठी म्हणाले, “जेव्हा मी ऐकले की पाकिस्तानचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे, तेव्हा मी हसलो. पाकिस्तानने भारतात अजिबात जाऊ नये असा हा मार्ग आहे. मला असे म्हणायचे आहे की हा सामना चेन्नई किंवा कोलकाता येथे झाला असता तर त्याला काही अर्थ प्राप्त झाला असता. मला कोणत्याही राजकारणात पडायचे नाही, परंतु मला वाटते की यामागे राजकीय दृष्टीकोन आहे. कारण हे एकमेव राज्य आणि शहर आहे जिथे आमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.”
पीसीबी प्रमुख नजम सेठी पुढे म्हणाले, “हे अहमदाबाद आहे आणि मला वाटते की याबद्दल जितके कमी बोलले जाईल तितके चांगले. हे असे आयोजन करणे म्हणजे आमच्या मार्गात अडथळे आणण्यासारखे आहे. भारताकडून आम्हाला सांगितले जात आहे की तुम्हाला आमच्याविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळावे लागेल, आम्ही पाहून घेऊ सुरक्षेबाबत काय होते ते त्याची चिंता तुम्ही करू नका.”
पुढे सेठी म्हणाले की, “अहमदाबादमध्ये कोणाची राजवट चालते हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तिथे तुम्ही सामना खेळवणार असाल तर आम्ही भारतात जाणार नाही. PCB आशिया चषक २०२३चे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध आहेत.” मात्र, आशिया चषकाचे सामने खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आशिया चषक २०२३ तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याबाबतही चर्चा आहे. त्याचबरोबर पीसीबीने बीसीसीआयला अल्टिमेटमही दिला आहे की, “जर तुम्ही पाकिस्तानात येऊन खेळणार नसला तर आम्हीही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही.”