|| ऋषिकेश बामणे
‘एफआयएच’चे अध्यक्ष नरेंदर बत्रा यांचे भारतीय प्रशिक्षकांना खडे बोल
पंचांवर पराभवाचे खापर फोडून स्वत:च्या चुकांवर पडदा टाकणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण असून प्रशिक्षकाने खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारण्यास शिकले पाहिजे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी शनिवारी भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना फटकारले.
गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताला नेदरलँड्सविरुद्ध पंचांच्या चुकीच्या निर्णयांमुळे २-१ असा पराभव स्वीकारावा लागला, असा खुलासा हरेंद्र सिंग यांनी केला होता. त्याविषयी शनिवारी पहिल्या उपांत्य सामन्यापूर्वी बत्रा यांनी त्यांचे मत मांडले. बत्रा म्हणाले, ‘‘मला भारताच्या प्रशिक्षकांचे वागणे अजिबात आवडलेले नाही. विश्वचषकानंतर मी दिल्लीला जाऊन सर्वप्रथम त्यांची भेट घेणार आहे. पंचांनी या स्पर्धेत त्यांचे सर्वोत्तम योगदान दिले असून कोणत्याही पराभूत संघाकडून त्यांच्यावर टीका होणे साहजिकच आहे. त्यामुळे पराभवाची विविध कारणे शोधण्यापेक्षा प्रथम पराभव मान्य करून विरोधी संघाचे अभिनंदन करत खिलाडूवृत्ती दाखवावी.’’
‘‘विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या पंचांच्या गाठीशी अनेक वर्षांचा अनुभव असतो. त्यामुळे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी दहा वेळा विचार करावा. स्थानिक स्पर्धेपासून ते देशांतर्गत स्पर्धामध्ये आपले कौशल्य सिद्ध केल्यानंतरच त्यांची विश्वचषकासाठी नियुक्ती केली जाते. त्याशिवाय स्पर्धेत बहुतांश रेफरल हे पंचांनी स्वत:हूनच घेतलेले असतात, कारण प्रत्येक ठिकाणी पंचाचे लक्ष असू शकत नाही. त्यामुळे एफआयएचचे पंचांना सहकार्य असून त्यांच्याविरुद्ध गैरवर्तन करणाऱ्या प्रत्येक संघाची आम्ही चौकशी करणार आहोत,’’ अशा कठोर शब्दांत बत्रा यांनी आपले मत मांडले.
याव्यतिरिक्त, एफआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) थिअरी वेल यांनीदेखील हरेंद्र यांचे पंचांवर आरोप करणे चुकीचे असून याविषयी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हरेंद्र यांच्यावर टांगती तलवार?
नेदरलँडसविरुद्धच्या पराभवानंतर पंचांवर आरोप करणारे भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे पुढील आठवडय़ात चौकशी होणार आहे. त्यांच्या गेल्या सहा महिन्यांतील कामगिरीचे विश्लेषणही केले जाणार आहे. हरेंद्र यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ रविवारी विश्वचषकाच्या सांगतेसोबतच संपत असून त्यांनाही नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुलमधील भारताच्या अपयशानंतर हरेंद्र यांना भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नेमण्यात आले होते. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने यावेळी चॅम्पियन्स करंडकात उपविजेतेपद, आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे स्थान तर विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र महत्त्वाच्या स्पर्धेनंतर प्रशिक्षकांची गच्छंती किंवा अदलाबदल होण्याची परंपरा यावेळीही कायम राहणार का, याची उत्सुकता तमाम हॉकी चाहत्यांना लागली आहे.