जागतिक स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी मी उत्सुक आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सुशील कुमारलाही मागे टाकून मी हे यश मिळवीन, असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा मल्ल नरसिंग यादवने व्यक्त केला. आगामी जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे.
सुशील कुमार हा सध्या ७४ किलो गटांत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. जागतिक स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत त्याने दुखापतीमुळे भाग घेतला नाही. त्यामुळे त्याच्या वजनी गटात नरसिंगने चाचणीत प्रवीण राणावर मात करीत भारतीय संघात स्थान मिळवले. जागतिक स्पर्धा ही ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेद्वारे रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित करण्याबाबत नरसिंग उत्सुक आहे.
नियमानुसार जागतिक स्पर्धेद्वारे संबंधित देशाला ऑलिम्पिकचा कोटा (पात्रता) मिळतो. साहजिकच जरी नरसिंगने जागतिक स्पर्धेत पात्रता पूर्ण केली तरी रिओ ऑलिम्पिकसाठी संघ निवडताना सुशील किंवा नरसिंग यापैकी एकाच खेळाडूला स्थान मिळणार आहे. याबाबत नरसिंग म्हणाला, ‘‘सहसा जे खेळाडू ही पात्रता पूर्ण करतात त्यांनाच ऑलिम्पिकची संधी दिली जाते. सुशील कुमारने येथील चाचणीत भाग घेतला असता तर निश्चितपणे माझ्याबरोबर त्याची चांगली लढत झाली असती.’’
‘‘खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीवरूनच ऑलिम्पिकसाठी संघ निवडला जातो. नरसिंग हा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करील, अशी मला खात्री आहे. ज्या वजनी गटांकरिता आम्हाला ऑलिम्पिक कोटा उपलब्ध होईल, त्यानंतरच आम्ही पुन्हा निवड चाचणी घेणार आहोत,’’ असे भारतीय फ्रीस्टाइल संघाचे मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनी सांगितले.

Story img Loader