रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील ७४ किलो वजनी गटासाठी सुशील कुमारपेक्षा नरसिंग यादवच योग्य आहे, अशी भूमिका भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात मांडली.
सुशीलने भारताला दोन ऑलिम्पिक पदके जिंकवून दिली आहेत. त्याचबरोबर ही त्याची शेवटची ऑलिम्पिकवारी ठरू शकते. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी सुशील आतुर आहे. त्यामुळेच नरसिंगने जरी ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवली असली तरी ७४ किलो वजनी गटामध्ये आमच्यापैकी कोण अव्वल आहे, हे ठरवण्यासाठी चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी सुशीलने केली आहे. पण दुसरीकडे सुशील गेल्या दोन वर्षांमध्ये जास्त सामने खेळलेला नाही.
‘‘आतापर्यंत सुशील एकदाही प्रो-कुस्ती लीगमध्ये खेळला नाही. पण सुशीलला चाचणी खेळवण्याची संधी न देण्याचा पवित्रा महासंघ घेत असून हा त्यांचा मनमानी कारभार आहे,’’ असा युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ञ अमित सिब्बल यांनी सुशीलची बाजू मांडताना केला आहे.
महासंघाने आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ऑलिम्पिकसाठी ७४ किलो वजनी गटामध्ये नरसिंग यादव हाच भारतातला अव्वल कुस्तीपटू आहे. त्याची निवड ही योग्य आणि पारदर्शी पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही नरसिंगची बाजू घेत आहोत, असे आरोप कुणीही करू शकत नाही.’’

Story img Loader