महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्र केसरी’ या प्रतिष्ठेच्या किताबाची हॅट्ट्रिक साधण्याच्या दिशेने मुंबईच्या नरसिंग यादवने गादी विभागातून आगेकूच केली. त्याला बुधवारी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या लढतीत मुंबईच्याच सुनील साळुंके याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.
भोसरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ऑलिम्पिकपटू नरसिंगने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने गादी विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या महादेव सरगर याच्यावर ८-० असा सफाईदार विजय मिळविला. त्याने लढतीच्या सुरुवातीला धोबीपछाड डाव टाकून तीन गुण वसूल केले. पाठोपाठ त्याने आणखी दोन वेळा महादेवला खाली घेत प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. ही लढत त्याने ८-० अशी जिंकताना निर्विवाद वर्चस्व गाजविले पण त्याचबरोबर मुख्य किताबाच्या लढतीसाठी आपले पारडे जड केले आहे. नरसिंगने गेली दोन वर्षे महाराष्ट्र केसरी किताब मिळविला आहे. त्याने लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
माती विभागात महाराष्ट्र केसरी गटाच्या अंतिम लढतीत साळुंकेने कोल्हापूरच्या प्रदीप आबदारचे आव्हान ८-६ असे परतविले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी कुस्तीचे सुरेख कौशल्य दाखविले. साळुंकेने पहिल्या फेरीत ६-४ अशी आघाडी घेतली होती. या फेरीत दोन्ही खेळाडूंनी दुहेरी पट काढत गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत सुरुवातीला प्रदीपने दोन गुण घेत ६-६ अशी बरोबरी केली. तथापि, साळुंकेने त्यानंतर भारंदाज डाव टाकून दोन गुण वसूल केले. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णायक ठरली.
महाराष्ट्र केसरी किताबासाठी बुधवारी सायंकाळी पाच वाजता लढत होणार आहे. ही लढत आंतरराष्ट्रीय मॅटवरच होणार आहे. लढतीमधील विजेत्या खेळाडूस ज्येष्ठ कुस्तीगीर मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा दिली जाणार आहे.

Story img Loader