Nasser Hussain on Suryakumar Yadav: “सूर्यकुमार यादवला ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये काहीही समजत नाही, मात्र तो टी-२०मध्ये चमकदार खेळ करतो आणि या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात त्याच्यावर सर्वांची नजर असेल,” असा विश्वास इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केला. एकदिवसीयमध्ये सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर त्याने जोरदार टीका देखील केली आहे. २०२१मध्ये भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ६० टी -२० सामन्यांमध्ये ४ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत.
नासिर हुसैनच्या या टिप्पणीमुळे सूर्यकुमार यादव भडकणार?
सूर्यकुमार यादवने २०२२मध्ये आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला होता. सूर्यकुमार यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये तोच प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. नासिर हुसेनने आयसीसी क्रमवारीचा हवाला देत टीका केली आहे. तो म्हणाला, “सध्या जगाच्या नजरा टी-२० क्रिकेटमधील सूर्यकुमारवर आहेत. तो चाणाक्ष खेळाडू असून तो गोलंदाजाच्या विचारांशी खेळतो. तो मिस्टर ३६० आहे कारण, तो मैदानाच्या सर्व बाजूंना चौफेर फटके मारतो. मात्र, पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला याची पुनरावृत्ती करता आलेली नाही.”
इंग्लंडचा माजी खेळाडू त्याच्यावर टीका करताना म्हणाला की, “तो सनकी क्रिकेटर आहे कारण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला कधी फटके मारायचे आणि कधी मारायचे नाहीत, नेमकं हेच कळत नाही. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये, स्कायला नेमके काय, हे माहित असते. टी-२० क्रिकेट आणि स्कायचे कॉम्बिनेशन पाहणे खूप मजेदार आहे.”
एकदिवसीय फॉर्मबाबत असे सांगितले
नासिर हुसेन पुढे म्हणाला, “प्रत्येक वेळी त्याला माहित असते की टी-२० क्रिकेटमध्ये कधी आणि कुठे फटके मारायचे आहेत. टी-२० हे एक मजेदार क्रिकेट आहे आणि त्यात सूर्यकुमारची फलंदाजी पाहणे म्हणजे एक मोठी पर्वणी आहे.” T20 विश्वचषक जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. नासिर म्हणाला की, “दक्षिण आफ्रिका विजेतेपद जिंकू शकते. मी याबद्दल जास्त विचार केला नाही पण त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. इंग्लंड सध्याचा चॅम्पियन आहे, पण ते सध्या फॉर्मात नाही. वेस्ट इंडिजचा आणि पाकिस्तानचाही संघ चांगला आहे. मला वाटते की फायनल दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात होईल.”
ऋषभ पंतच्या यशस्वी पुनरागमनाची आशा व्यक्त केली
यापूर्वी नासिर हुसेनने भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या यशस्वी पुनरागमनाची आशा व्यक्त केली होती. ऋषभ पंत वर्षभरापूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्यातून तो सावरत आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ऋषभ पंत क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे. हुसैन म्हणाला, “हा एक अतिशय गंभीर अपघात होता. संपूर्ण जगाचा श्वास त्यावेळी रोखला गेला होता आणि त्याची पुनरागमनाची प्रक्रिया देखील मंदावली होती. बरे झाल्यानंतरची त्याची सुरुवातीचा सराव आणि नंतर जिममध्ये प्रशिक्षण घेत असताना रिकी पाँटिंगबरोबरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. अॅशेसमध्ये मी रिकीबरोबर होतो आणि रिकीने मला त्याची प्रगती कशी झाली हे सांगितले. तो ‘बॉक्स ऑफिस’ (हिट) क्रिकेटर आहे.”