IND vs AUS 3rd Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने टीम इंडियाविरुद्ध इतिहास रचला आहे. लायनने गिलची विकेट घेऊन इतिहास रचला आहे. तो भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला आहे.
या सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील १०९ धावांसमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १९७ धावांवर गारद झाला होता. टीम इंडियाने दुसऱ्या डावात शुबमन गिलच्या रुपात १५ धावांवर पहिली विकेट गमावली. गिलच्या विकेटसह नॅथन लायनच्या खात्यात भारताविरुद्ध १०८६ विकेट्स जमा झाल्या आहेत. त्यानंतरही त्याने भारतीय संघाला दोन धक्के दिले. तो टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. ज्याने भारताविरुद्ध १०५ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताविरुद्ध सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू-
नॅथन लायन – १०८*
मुथय्या मुरलीधरन – १०५
लान्स गिब्स – ६३
डेरेक अंडरवुड – ६२
दुसरीकडे, जर आपण भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांबद्दल बोललो (वेगवान आणि फिरकीपटूंसह), तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन १३९ विकेट्ससह या यादीत अव्वल आहे.
भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज –
जेम्स अँडरसन – १३९
नॅथन लिऑन – १०८*
मुथय्या मुरलीधरन – १०५
इम्रान खान – ९४
माल्कम मार्शल – ७६
दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाला आज मोठी धावसंख्या उभारण्याची उत्तम संधी होती. पहिल्या दिवसअखेर पाहुण्यांनी १५६ धावा केल्या होत्या आणि फक्त ४ विकेट गमावल्या होत्या. पीटर हँड्सकॉम्ब आणि कॅमेरॉन ग्रीन या जोडीने या दिवशी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या तासात ३० धावांची भर घातली, पण अश्विनने हँड्सकॉम्बची विकेट घेत ही जोडी फोडताच पाहुणा संघ पत्त्यासारखा कोसळला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४ विकेट गमावून १८६ अशी होती, मात्र अश्विन आणि उमेशच्या जीवघेण्या गोलंदाजीमुळे संपूर्ण संघ २९ मिनिटांत १९७ धावांत गारद झाला. या काळात अश्विन आणि उमेशने ३-३ बळी घेतले, तर जडेजाला पहिल्या दिवशी ४ विकेट मिळाले.
त्याचबरोबर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. टीम इंडियाने ३४ षटकांत ४ बाद १०१ धावा केल्या आहेत. ज्यामुळे भारतीय संघाला अवघ्या १३ धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्मा (१२), शुबमन गिल (५), विराट कोहली (१३) आणि रवींद्र जडेजा (७) धावा काढून बाद झाले. त्यामुळे भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. तसेच सध्या चेतेश्वर पुजारा (४३) आणि श्रेयस अय्यर (१५) धावांवर खेळत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायनने तीन विकेट घेतल्या.