एखाद्या गोष्टीची आपल्यासमोर सुरुवात होते. तो माणूस आपल्यासमोर बघता बघता मोठा होत जातो ते अनुभवणं विलक्षण असतं. जगात कुठेही क्रिकेटची मॅच असेल तर ती पाहणं हे जणू कर्तव्यच आहे या भावनेतून त्यादिवशी टीव्ही लावला. १२ वर्षांपूर्वींची गोष्ट. टेन स्पोर्ट्स नावाचा चॅनेल होता. ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. मागे किल्ला, एका बाजूला समुद्राची गाज ऐकायला येतेय असं गॉलचे ऐतिहासिक स्टेडियम. ऑस्ट्रेलियाने एका फिरकीपटूला पदार्पणाची संधी दिली. पदार्पणातच बऱ्यापैकी टक्कल पडलेला कार्यकर्ता पाहून चकित व्हायला झालं. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेचा डाव आटोपला. दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे खेळाडू फलंदाजीसाठी उतरले. त्यांच्याही विकेट्स जाऊ लागल्या. भरवशाचा कुमार संगकारा फलंदाजीला आला. कर्णधार मायकेल क्लार्कने चेंडू त्या नव्या कार्यकर्त्याकडे सोपवला. एवढ्या लगेच आपल्याला बॉलिंग मिळेल असं त्याला वाटलं नव्हतं पण अचानक मिळालेल्या संधीने त्याच्या शरीरात ऊर्जा संचारली. स्पिनर सजवतात तसं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं. समोर संगकारासारखा मातब्बर लढवय्या. चेंडू टप्पा पडून बाहेरच्या दिशेने निघणार तेवढ्यात संगकाराला चेंडू तटवून काढावासा वाटला. चेंडू वळला आणि स्लिपमध्ये क्लार्कने जमिनीपासून जरासा वर अफलातून झेल टिपला. समालोचक चीत्कारले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. कारण कसोटी क्रिकेटमधल्या पहिल्याच चेंडूवर विकेट पटकावण्याचा विक्रम झाला होता. श्रीलंकेचे चाहते नि:शब्द झाले. मैदानातल्या मूठभर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी झेंडा फडकवायला सुरुवात केली. त्या कार्यकर्त्याचं नाव होतं-नॅथन लॉयन. तो दिवस होता १ सप्टेंबर २०११.

आता मॅच पाहायला टीव्ही लावावा लागत नाही हा एक मोठाच बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाची मॅच असल्याने हॉटस्टारवर गेलो. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे शरणागती एवढंच असतं. गेल्या २८ वर्षात त्यांनी तिथे टेस्ट जिंकलेली नाही. पाकिस्तानचा चौथा डाव झटपट गुंडाळण्यासाठी मिचेल स्टार्क- पॅट कमिन्स- जोश हेझलवूड हे त्रिकुट आतूर होतं. पण त्यांच्याहीपेक्षा जास्त विकेटसाठी एक कार्यकर्ता आतूर होता. पाकिस्तानच्या फहीम अशरफला त्याचा चेंडू कळला नाही आणि पॅडवर जाऊन आदळला. अपील झालं पण अंपायर रे इलिंगवर्थ यांनी नकार दिला. कॅप्टन कमिन्स, तो आणि विकेटकीपर अॅलेक्स कॅरे यांच्यात चर्चा झाली आणि डीआरएस घेत असल्याचं सांगितलं. जायंट स्क्रीनवर रिप्ले दिसू लागला. बॅट लागली नसल्याचं स्पष्ट झालं. बॉल ट्रॅकिंग आलं, धडधड वाढली. चेंडू टप्पा पडून स्टंप्सवर आदळत असल्याचं दिसताक्षणीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तुफानी जल्लोष केला. कारण एक तपापूर्वी पहिल्या चेंडूवर विकेट पटकावणाऱ्या नॅथन लॉयनने ५००टेस्ट विकेट पटकावली होती. ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या खेळाडूंनी अगदी एनर्जी ड्रिंक घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनीही लॉयनला जादू की झप्पी दिली. जायंट स्क्रीनवर नॅथन लॉयन ५०० विकेट्स असे शब्द अवतरले. मैदानातल्या खास कक्षात नॅथनची बायको आनंदाने टाळ्या वाजवत होती. अख्ख्या स्टेडियमने लॉयनला उभं राहून अभिवादन केलं. एनर्जी ड्रिंक पिता पिता लॉयनने या सगळ्याचा स्वीकार केला. कसोटी प्रकारात ५०० विकेट पटकावणारा लॉयन केवळ आठवा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियासाठी ५०० हून अधिक विकेट्स फक्त शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा या दिग्गजांच्या नावावर आहेत. लोभसवाण्या मांदियाळीत लॉयनचं नावं गौरवाक्षरात लिहिलं गेलं.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

ग्रेट, लिजंड, मॅव्हरिक ही विशेषणं उपयोगात आणायची वेळ दुर्मीळतेने येते. नॅथन लॉयन वॉर्न-मॅकग्रा तोडीचा गोलंदाज आहे का, वॉर्नचा फिरकी वारसा त्याने चालवला का, गेल्या एका तपातला तो सर्वोत्तम फिरकीपटू आहे का या शंकाकुशंका थोडा वेळ बाजूला ठेऊया. एक तप अविरत फिट राहणं, सातत्याने खेळात सुधारणा करणं, समकालीनांचा मत्सर न करता त्यांच्याकडून शिकणं, पेस बॅटरीला पूरक होणं, संघाला जेव्हा गरज आहे तेव्हा बॅटने किल्ला लढवणं, विजयासाठी जीव तोडून क्षेत्ररक्षण करणं या सगळ्या धडपडीला-प्रयासाला तुम्ही काहीही म्हणा. पण नॅथन लॉयनच्या निष्ठेबद्दल तुम्ही तसूभरही शंका घेऊ शकत नाही. तुम्ही कोणत्या कालखंडात जन्मता हे तुमच्या हातात नसतं पण कळायला लागल्यानंतर कर्तृत्व सिद्ध करणं तुमच्या हातात असतं. महान शेन वॉर्नने निवृत्ती घेतल्यानंतर एक पोकळी खरंतर भगदाडच पडलं होतं. अनेक आले, गेले. ऑस्ट्रेलियाचं हसंही झालं. या काळात त्यांनी काही फलंदाजांना फिरकीपटू केलं. नवी मालिका, नवा फिरकीपटू असं व्हायचं. त्या काळात लॉयन आला. चाचपडला, स्थिरावला. आपली कौशल्यं सातत्याने परजत गेला. जगाचा लंबक कसोटीकडून वनडेकडे, वनडेकडून ट्वेन्टी२०कडे, ट्वेन्टी२०कडून १०कडे वळत असताना लॉयन कसोटी खेळत राहिला. ओल्ड स्कूल राहिला. आयपीएलचं मोठ्ठं कंत्राट त्याच्या नावावर झालं नाही. ऑस्ट्रेलियासाठी त्याने वनडे वर्ल्डकप जिंकला नाही. पण त्याने जे केलं ते फक्त तीनच खेळाडूंना करता आलंय. आता एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून लॉयनच्या कारकीर्दीकडे पाहूया. गॉलच्या त्या निसर्गरम्य मैदानावर लॉयनच्या बरोबरीने आणखी एका कार्यकर्त्याला ऑस्ट्रेलियाची कॅप देण्यात आली होती. त्याचं नाव होतं- ट्रेंट कोपलँड. वेगवान गोलंदाज होता. ट्रेंट ३ कसोटी खेळला. लॉयनच्या नावावर १२३ कसोटीत ५०१ विकेट्स आहेत. ट्रेंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नॅथन लॉयन पर्वताएवढा मोठा झाला. विक्रम, आकडेवारी ही बोलकीही असते आणि फसवीही. लॉयनच्या बाबतीत बोलकी आहे. २०१३ ते २०२३ या दशकभरात लॉयन सलग १०० कसोटी खेळला. म्हणजे जेवढ्या कसोटी ऑस्ट्रेलियाने खेळल्या तेवढ्या लॉयनने खेळल्या. याचा अर्थ कामगिरीत सातत्य असल्यामुळे त्याला वगळण्याचा विषयच आला नाही आणि फिट असल्यामुळे संघाबाहेर करण्याचा मुद्दा निकाली लागला. लॉयनच्या बाबतीत नेहमी एक बोललं गेलं की त्याच्या गोलंदाजीवर धावा कुटल्या जातात. ते खरंही आहे. त्याचं कारणही आहे. स्टार्क-हेझलवूड-कमिन्स हे त्रिकुट आग ओकतं. याचा अनुभव आपण अलीकडेच घेतला. त्यांच्याऐवजी जो कुणी गोलंदाजीला येतो त्याला तडाखा बसणं साहजिक. लॉयनचं वैशिष्ट्य हे की प्रतिस्पर्धी फलंदाज मारु लागल्यानंतर तो बिचकून जात नाही. तो सापळे लावतो, अडकवतो. ऊन मी म्हणत असतानाही लॉयन मागे हटत नाही. आशियाई उपखंडात बोटांना घट्टे पडू लागतात. चेंडू घासून घासून पँटचा मांडीकडचा भाग लाल होऊन जातो. कर्णधार बदलले, वेगवान त्रिकुट बदललं पण लॉयन येत राहतो. त्याला मरगाळलेलं कधीच पाहिलं नाही.

५०० विकेट पटकावली त्या टेस्टच्या सुरुवातीला लॉयनने कारकीर्दीतलं रवीचंद्रन अश्विनचं महत्त्व सांगितलं. अश्विन एक महान खेळाडू आहे. आम्ही एकमेकांविरुद्ध अनेकदा उभे ठाकलो पण मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. एकप्रकारे तो माझा गुरु, मार्गदर्शक प्रशिक्षकच आहे. स्वत: विक्रमाधीश होत असताना समकालीन दिग्गजाचं मोठेपण सांगण्याची कृतज्ञता किती लोकांकडे असते? गंमत अशी की पल्लेदार फिरकीचे स्पेल टाकत राहणं हे लॉयनचं कामच नव्हतं. अॅडलेड ओव्हल हे मखमली कॅनव्हासचं मैदान सांभाळणाऱ्या क्युरेटर टीममध्ये लॉयन होता. बिग बॅश स्पर्धेतील रेडबॅक्स संघाचे प्रशिक्षक डॅरेन बेरी यांनी लॉयनचं गोलंदाजी नैपुण्य हेरलं. २०१०-११ अॅशेस मालिकेवेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माईक हसीला सरावासाठी चांगला फिरकीपटू हवा होता. तोवर लॉयनचं नाव हसीच्या कानावर आलं होतं. मुख्य क्युरेटर डॅमियन हॉघ यांना हसीने विनंती केली लॉयनला गोलंदाजीसाठी पाठवा. गवत कापणे, रोलर फिरवणे, मैदान सुस्थितीत आहे याची पाहणी करणे या कामात गर्क असलेला लॉयन काही मिनिटात हसीला गोलंदाजी करु लागला. या मुलाकडे कौशल्यगुण आहेत हे हसीने हेरलं. त्याने संघव्यवस्थापनाला तशी माहिती दिली. त्याच वर्षी श्रीलंकेला जाणाऱ्या विमानात बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघात त्याचा समावेश होता.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या चेंडूवर विकेट पटकावण्याची किमया फक्त २० गोलंदाजांनाच साधली आहे. पहिली विकेट मिळण्यासाठी गोलंदाजांना अथक मेहनत करावी लागते. तरी नशीब साथ देत नाही असं होतं. लॉयनने पहिल्याच चेंडूसह ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटूचा शोध संपला. आता मीच असेन हे ठामपणे सांगितलं. पहिल्या चेंडूवर विकेट मिळणं त्याच्या डोक्यात गेलं नाही. लॉयनने डावात ५ विकेट्सही घेतल्या. एखाद्या कार्यात कोपऱ्यात समई ठहरावात तेवत राहावी तसं लॉयन खेळत राहिला आहे. काळाचं आवर्तन बदललं, वेग वाढला. वाचन मागे पडून व्हीडिओ पाहणं ट्रेन्डिंग झालं. कामाइतकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त स्वत:चं विपणन करणं महत्त्वाचं झालं. तत्वं बदलली. जंटलमन असण्यापेक्षा ड्यूड, हंक होणं खपणीय झालं. त्या काळात लॉयन कसोटी खेळत राहिला. संधी मिळाली तेव्हा वनडे आणि ट्वेन्टीही खेळला. पण त्याचा बेस कसोटी सामनेच राहिला. वेगवान गोलंदाजी हे ऑस्ट्रेलियाचं प्रमुख अस्त्र आहे. त्यामुळे फिरकीपटू दुसऱ्या फळीतच राहतो. लॉयनने याचं कधी वाईट वाटून घेतलं नाही. आशियाई उपखंडात खेळताना त्याने दिवसदिवस गोलंदाजी करत ती कसर भरुन काढली. लॉयनला दुसऱ्या बाजूने साथ कधीच मिळाली नाही. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ एकच फिरकीपटू खेळवतो. एकांडा शिलेदार असल्याने लॉयनवर धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं अशी दुहेरी जबाबदारी होती. धावा जास्त दिल्या खऱ्या पण खंडीभर विकेट्स मिळवत राहिला. प्रतिस्पर्ध्यांच्या अंगणात तुम्ही कसे खेळता यावर तुमचं कर्तृत्व ठरतं. या निकषावर लॉयनने बाजीच मारली. लॉयनने सर्वाधिक वेळा बाद केलेल्या फलंदाजांमध्ये पहिलं नाव आहे- चेतेश्वर पुजारा, दुसरं नाव आहे- अजिंक्य रहाणे. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ज्यांचं नाव घेतलं जातं त्या दोघांना माघारी धाडण्याचं कसब लॉयनकडे होतं. रोहित शर्माला ९ वेळा तर विराट कोहलीला ७ वेळा बाद केलं आहे. ग्रेटनेस सिद्ध करण्यासाठी आणखी कोणाचं नाव घ्यावं…

एखादा माणूस कार्यालयात खूप वर्ष काम करत राहिला तर ग्रेट होतो का? खूप वर्ष चांगलं काम करत राहिला यात महानतेचं बीज दडलं आहे. लॉयन खेळत असताना डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ मोठे झाले. मार्नस लबूशेन नंतर येऊन मोठा झाला. स्टार्क-कमिन्स-हेझलवूड यांचीच चर्चा असते. आणखीही मंडळी आली, चर्चेत राहिली. लॉयन प्रसिद्धी, चर्चा यात मागे राहिला. पण त्याच्यासाठी ते महत्त्वाचं नव्हतंच. कर्तव्याप्रति १०० टक्के देणं हे लॉयनचं ध्येय होतं. त्यासाठी तो झटत राहिला. सँडपेपर गेट प्रकरणाने ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट ढवळून निघालं. लॉयन स्थिर होता. विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ एक गाणं म्हणतो. संघातल्या एकाकडे समूहगानाचं नेतृत्व सोपवलं जातं. माईक हसीकडे ते नेतृत्व होतं. निवृत्त होताना हसीने ही मशाल नॅथन लॉयनकडे सोपवली. दुसऱ्या फळीत राहूनही आधारवडरुपी नेता होता येतं हे लॉयनने दाखवून दिलं. ही शिकवण आपल्यासारख्या धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी मोलाची!

Story img Loader