Border Gavaskar Trophy 2024: भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे, जेथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. ही कसोटी मालिका सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे, पण आधीच त्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे कर्णधार पॅट कमिन्सने दीर्घ विश्रांती घेतली आहे जेणेकरून तो पूर्ण तयारीनिशी या मालिकेत उतरेल, तर दुसरीकडे इतर खेळाडूंनीही भारतीय संघाविरूद्धच्या या मोठ्या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघ विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यापेक्षा भारताच्या या नव्या तरूण खेळाडूविरूद्ध रणनिती आखणार आहे.
ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लॉयन देखील या कसोटी मालिकेसाठी खूप उत्साहित आहे.भारतीय युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल कांगारू संघाच्या गोलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. यशस्वीने इंग्लंडविरुद्ध केलेली अप्रतिम कामगिरी पाहिल्यानंतर तो त्याच्याविरूद्ध गोलंदाजी करण्यास उत्सुक असल्याचे लॉयनचे मत आहे. यशस्वीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती.
हेही वाचा – Vinesh Phogat: थकलेल्या विनेश फोगटला गावातील सत्कार समारंभादरम्यान आली चक्कर, VIDEO होतोय व्हायरल
इंग्लंड संघाने २०२४ च्या सुरुवातीला भारताचा दौरा केला होता आणि दोन्ही संघांमध्ये आणि ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वाल आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने ५ सामन्यांच्या ९ डावात ७१२ धावा केल्या. या कसोटी मालिकेत त्याची सरासरी ८९.०० होती आणि यादरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. यशस्वीने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी २१४ धावांची नाबाद खेळीही खेळली.
यशस्वीबद्दल लॉयन म्हणाला की, “मी अजून त्याला (जैस्वाल) भेटलेलो नाही, पण आम्हा सर्व गोलंदाजांसाठी ते मोठे आव्हान असेल. तो (जैस्वाल) इंग्लंडविरुद्ध ज्या प्रकारे खेळला, ते मी खूप जवळून पाहिलं आणि मला वाटतं की तो कमाल खेळला आहे.” यशस्वी जैस्वालने भारतासाठी आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ६८.५३ च्या सरासरीने १०२८ धावा केल्या आहेत ज्यात ३ शतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले की त्याने टॉम हार्टलीशी भारतीय फलंदाजांना कसे मात देण्याचा प्रयत्न केला याबद्दल चर्चा केली होती तो म्हणाला- मी टॉम हार्टली (इंग्लंडचा डावखुरा फिरकीपटू) यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली, ज्यामध्ये तो वेगवेगळ्या खेळाडूंसोबत वेगवेगळ्या प्रकारे खेळला, जे मला खूप मनोरंजक वाटले.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आपला दबदबा कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने २०१४-१५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताविरुद्ध २-० ने जिंकल्यानंतर पुढील चार मालिका गमावल्या आहेत. कांगारूंनी विराट कोहली (२०१६-१७, २०१८-१९), अजिंक्य रहाणे (२०२१) आणि रोहित शर्मा (२०२३) यांच्या नेतृत्वाखालील भारताने कांगारूंना पराभवाचं पाणी पाजलं.