महाराष्ट्राच्या वर्चस्वाला धक्का देत पुडूचेरीने येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय आटय़ापाटय़ा स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही गटांचे विजेतेपद मिळविले.
क्रीडा भारती आणि जिल्हा आटय़ापाटय़ा संघटना यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत शुक्रवारी पुरुषांच्या अंतिम फेरीत विजय भास्कर, राज कुमार यांच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर पुडूचेरीने महाराष्ट्राचा २०-१५, २३-१८ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सागर गुल्हाने, अमित चव्हाण, आकाश नांदुरकर, अमिल मोते यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
 महिलांच्या अंतिम सामन्यात पुडूचेरीने महाराष्ट्रावर ३३-१७, १२-९ अशी मात केली. शिवानी पाटील, खुशबु निवारे, पूजा बाभूळकर वगळता महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंनी निराशा केली. पुरूषांमध्ये तामिळनाडू व महिलांमध्ये कर्नाटकने तृतीय क्रमांक मिळविला. महाराष्ट्राचा सागर गुल्हाने आणि पुडूचेरीच्या पूरकोडी यांना सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष नारायणसिंग राणा, आ. डॉ. अपूर्व हिरे, क्रीडा भारतीचे प्रांताध्यक्ष डॉ. सतीश बोरकर यांच्या उपस्थितीत झाला.

नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय आटय़ापाटय़ा स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या पुदूच्चेरीच्या महिला संघास गौरविताना अखिल भारतीय क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष नारायणसिंग राणा. समवेत आ. डॉ. अपूर्व हिरे, विलास पाटील, प्रशांत भाबड आदी (छाया- सचिन निरंतर)