|| मुकुंद धस
भावनगर येथे झालेल्या ६९व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंजाबच्या पुरुषांनी सेनादलाचा ७४-६५ असा पराभव करून विजेतेपदाच्या चषकावर सातव्यांदा आपले नाम कोरले.
उंचीमध्ये सरस असलेल्या पंजाबने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले होते; परंतु सेनादलाने त्यांची आघाडी आवाक्याबाहेर जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत विजेत्यांवर दडपण ठेवले होते. पंजाबच्या अर्शप्रीतने ८ प्रयत्नांत तीन गुणांचे ६ बास्केट नोंदवून आक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावली, शिवाय अमृतपालला बचावातदेखील सुरेख साथ देत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पडली. अर्शप्रीतला सेनादलाच्या जोगिंदरने तीन गुणांचे ७ बास्केट नोंदवून चोख उत्तर दिले, परंतु त्याला इतरांची म्हणावी तशी साथ लाभली नाही. सूर गवसलेला महिपाल अपयशी ठरत असताना आयझ्ॉक थॉमसने आक्रमणात जोगिंदरला थोडीफार साथ दिली, परंतु जगदीप आणि अमृतपालच्या झंझावातापुढे ते निष्प्रभ ठरले. शेवटच्या सत्रात सेनादलाने सामन्यात प्रथमच ६२-६० अशी आघाडी घेतली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. जगदीप आणि अर्शप्रीतने सुरेख चाली रचून आघाडी खेचून घेतली आणि नंतर पंजाबने मागे वळून पाहिलेच नाही. शेवटच्या मिनिटात प्रिंसिपल सिंगने लागोपाठ तीन गुण नोंदवत ७०-६५ अशी मिळवून दिलेली आघाडी राजबीरने ७२-६५ अशी वाढवून सामन्याचा निकाल स्पष्ट केला. सेनादलाने शेवटी तीन गुणांचे बास्केट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु त्यांना यश मिळाले नाही आणि पंजाबने विजय साजरा केला.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात तमिळनाडूच्या पुरुषांनी कर्नाटकचा ८४-६४ असा, तर केरळच्या महिलांनी छत्तीसगडचा ७९-७३ असा पराभव केला.
अंतिम क्रमवारी : १. पंजाब, २. सेनादल, ३. तमिळनाडू, ४. कर्नाटक, ५. उत्तराखंड, ६. राजस्थान, ७. रेल्वे, ८. हरयाणा, ९. दिल्ली, १०. केरळ