अहमदाबाद : मल्लखांब प्रकारातील तीन सुवर्णपदकांसह मिळविलेल्या सहा पदकांच्या जोरावर सोमवारी महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. महाराष्ट्राने आता ३४ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ५७ कांस्यपदकांसह एकूण १२८ पदके मिळवून हरयाणाला मागे टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेनादल संघ ५३ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २९ कांस्यपदकांसह एकूण ११५ पदकांसह आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. हरयाणाने एकूण पदकांचे शतक गाठले. मात्र, त्यांना ३२ सुवर्ण, ३०रौप्य आणि ३८ कांस्यपदकांसह तिसऱ्या स्थानावर घसरावे लागले.

मल्लखांब प्रकारात शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांची कामगिरी महाराष्ट्राच्या यशात निर्णायक ठरली. शुभंकर या पुण्याच्या खेळाडूने पुरलेल्या मल्लखांबावर लवचिकतेचे अप्रतिम प्रदर्शन केले.  दोरीच्या मल्लखांबावर अक्षय सरस ठरला. 

महिला विभागातील दोरीच्या मल्लखांब प्रकारात रूपाली गंगावणेने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक पटकाविले. पुरलेल्या मल्लखांबावर मात्र तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  दोरीच्या मल्लखांबावर नेहा क्षीरसागर कांस्यपदकाची मानकरी ठरली.  जान्हवी जाधवने रौप्यपदक जिंकले.

बॉक्सिंग प्रकारात निखिल दुबेने ७५ किलो आणि रेनॉल्ड जोसेफने ९२ किलो गटात उपांत्य फेरी गाठताना किमान कांस्यपदक निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीतील एकतर्फी लढतीत निखिलने दिल्लीच्या बंटी सिंगचा पराभव केला. रेनॉल्डने ९२ किलो गटात राजस्थानच्या वरूण शर्माचा पराभव करताना पंचांकडून ४-१ असा कौल मिळविला.

वुशू प्रकारात ओमकार पवार व संकेत पाटील या खेळाडूंना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ओमकारला जम्मू काश्मीरच्या अभिषेक जामवालने ७-७, ८-९ असे पराभूत केले. संकेतला सेनादलाच्या विकी रॉयकडून २-१२, ३-१४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. सॉफ्टबॉलमध्ये महाराष्ट्राला छत्तीसगडकडून ८-० असे पराभूत व्हावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National game 2022 maharashtra ranks second in medal tally due to three gold in mallakhambh zws