राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेच्या सलामीच्या दिवशी हरयाणाने सहा सुवर्ण आणि एका रौप्यपदकासह सर्वाधिक पदकांवर कब्जा केला. महाराष्ट्राने एक सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण सहा पदके पटकावली.
अ‍ॅथलेटिक्स प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने ४ बाय १०० मीटर शर्यतीत नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. जलतरणात २०० मी. फ्रीस्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या साजन प्रकाशने रौप्य तर सौरभ सांगवेकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये याच प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिक गांधीने रौप्यपदक पटकावले. १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात राज्याच्या ज्योत्स्ना पानसरेने रौप्यपदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगमध्ये ५३ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या दिक्षा गायकवाडने रौप्यपदकाची कमाई केली.  
दरम्यान, खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष व महिलांनी धडाकेबाज विजयी सलामी नोंदवली. पुरुष संघाने छत्तीसगढचा, तर महिलांनी ओडिशाचा पराभव केला.
महाराष्ट्राने छत्तीसगढवर १८-७ अशी एक डाव व ११ गुणांनी दणदणीत विजयाची नोंद केली. महाराष्ट्राकडून कप्तान नरेश सावंत (२.२० मि., १.५० मि. व ३ गडी), दीपेश मोरे (४.१० मि.), मििलद चावरेकर (३.३० मि. व ५ गडी), मनोज पवार (२.१० मि. नाबाद) यांनी उल्लेखनीय खेळ केला. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा १२-६ असा एक डाव व ६ गुणांनी पराभव केला. सारिका काळे (३.३० मि. व १ गडी), शीतल भोर (४ गडी), सोनाली मोकासे (३ गडी), शिल्पा जाधव (२.३० मि. नाबाद व १ गडी) चमकल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा