महाराष्ट्र, विदर्भ, कोल्हापूर व गोमांतक यांचे खो-खो विश्व फार मोठे नाही. ते असेल सुमारे शंभर संघांचे. त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत बारामतीकडे, ८ डिसेंबरपासून पाच दिवस रंगणाऱ्या खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपदाच्या स्पर्धाकडे. बारामती म्हणजे शरद पवार व आता अजित पवार हे त्या भागातले मावळते व उगवते सूर्य. दोघांचा आश्रय खो-खोला, कबड्डी-कुस्तीखालोखाल लाभलेला. बारामतीची मैदाने उत्तम असतील, राहणे व जेवण यांची व्यवस्था चांगली असेल. त्यामुळे खो-खोपटू आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करू शकतील, असा साऱ्या महाराष्ट्राचा विश्वास!
बारामतीत होणारी ही राष्ट्रीय अजिंक्यपदाची तिसरी स्पर्धा. या स्पर्धा-मालिकेस सुरुवात झाली १९७२मध्ये, चाळीस वर्षांपूर्वी. तो काळ तेव्हाचे राज्यमंत्री व युवा काँग्रेस नेते शरद पवार यांच्या उदयाचा आणि तेच होते खो-खोचे सुवर्णयुग. मुंबईतील विजय, विद्यार्थी, युवक, सरस्वती व सहकार; पुण्यातील नवमहाराष्ट्र, सन्मित्र, रमणबाग, इगल्स, सरस्वती व अहिल्यायन्स, बडोद्याचे मध्यस्थ रमत व गुजरात क्रीडा मंडळ, इंदोर-जबलपूरच्या हॅपी वाँडर्स व महाराष्ट्र क्रीडा मंडळ, बेळगावचा भगतसिंग महिला संघ, कर्नाटक पोलीस.. एकापेक्षा एक सरस. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे त्याचे विलक्षण चापल्य व कौशल्य..
त्या स्पर्धेत शरदरावांनी आपणहून एक उपक्रम हाती घेतला होता. राष्ट्रीय अजिंक्यपदाच्या स्पर्धासाठी जाणाऱ्या महाराष्ट्राच्या सबज्युनियर व ज्युनियर व खुल्या स्पर्धातील ७२ खेळाडू व १२ अधिकारी यांचा आर्थिक प्रश्न कायमचा सोडवावा, असे त्यांनी मनावर घेतले. त्यासाठी कायम स्वरूपाचा निधी उभारावा व त्याच्या व्याजातूनही व्यवस्था करावी, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ‘मी राज्यमंत्री आहे. जास्तीत जास्त जाहिरातदारांना माझ्याकडून विनंतीपत्रे घ्या आणि त्यांचा जातीने पाठपुरावा करा. काही अडचण आल्यास मला सांगा,’ अशा सूचना त्यांनी खो-खो पदाधिकाऱ्यांना दिल्या. या उपक्रमात कमी पडले ते खो-खो पदाधिकारी. ‘राष्ट्रीय स्पर्धा सहभाग निधी’ मला वाटते पन्नास महजारांच्या आसपास जमला, पण ७२ चे पन्नास हजार म्हणजे आजचे सुमारे वीस लाख. त्याचे सारे श्रेय शरदरावांनाच!
संकल्प दोन कोटींचा
त्या राष्ट्रीय स्पर्धेला आता चाळीस वर्षे उलटून गेली. चंद्रजित जाधव-तुषार सुर्वे आदी कार्यकर्त्यांच्या नवीन पिढीला पाठबळ लाभतेय, शरदरावांच्या पुतण्याचे- अजित पवारांचे. राज्य खो-खो संघटनेच्या तिजोरीत आता राखीव निधी, खेळाडू कल्याण निधी, पंच निधी आदी उपक्रमांसाठी छत्तीस लाख रुपये जमा आहेत. सब ज्युनियर, ज्युनियर व खुल्या राज्य स्पर्धा भरवणाऱ्या जिल्हा संघटनेस प्रत्येकी आठ लाख रुपये मदत मिळवून देत आहेत, अजितदादा. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष. अशा प्रत्येक राज्य स्पर्धेतून राज्य संघटनेला लाभतात पन्नास हजार रु. आणि खेळाडू व त्यांच्या जिल्हा संघटनांना रोख इनामाचे अडीच-अडीच लाख.
ही झाली जमेची बाजू. पैशाचे सोंग आणता येत नाही, हे सर्वापेक्षा अजितदादा जाणतात आणि त्यांच्या कारकिर्दीत राज्य संघटनेचा निधी दोन कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे स्वप्न आजचे पदाधिकारी बघतात, त्यात त्यांना काहीही वावगे वा अतिशयोक्तीचे वाटत नाही.
खेळाडूंचे कट आऊटस्!
या साऱ्या गोष्टी खो-खोप्रेमींना सुखावणाऱ्या, पण असली खो-खो कार्यकर्ते एवढय़ावर संतुष्ट-समाधानी नाहीत. त्यांच्या अपेक्षा आहेत, यानिमित्ताने खो-खोच्या आधुनिक सादरीकरणाच्या. खो-खो सामने चालू असताना, प्रत्येक सामन्यासाठी व प्रत्येक क्रीडांगणावर धावता गुणफलक, ही आहे प्रेक्षकांची प्राथमिक गरज, प्राथमिक अपेक्षा. त्यासह लावले गेले पाहिजे उलटी गणना (काऊंटडाऊन) करणारे मोठे घडय़ाळ. म्हणजे किती वेळ बाकी आहे, हे पाठलाग करणाऱ्यांना आक्रमकांना कळेल व त्यांना हुलकावण्या देणाऱ्या संरक्षकांनाही समजेल.
यात विशेष असे काही नाही. कबड्डीत धावता इलेक्ट्रॉनिक गुणफलक आणला उदय लाड यांनी आणि बास्केटबॉलच्या प्रमुख स्पर्धा इंडियन जिमखाना, डॉन बॉस्को, नागपाडा नेबरहूड येथे रंगतात तिथे काऊंटडाऊनला प्रेक्षक किती उत्साहाने प्रतिसाद देतात! विशेषत: शेवटच्या दहा सेकंदांत, शेकडो युवक एकसुरात दहा-नऊ-आठ-सात-सहा-पाच इ. उलटी गणना करतात, तोही अनुभव थरारक असतो!
बारामतीच्या स्पर्धेत शरदराव व अजितदादा यांचे कटआऊट्स क्रीडांगणात व गावभर लावले जातील. आश्रयदात्यांचे आभार त्यातून मानले जातील. कदाचित सोनियाजी व राहुलजी यांचेही लावले जातील, पण त्यांना खेळाडूंच्या कटआऊट्सची जोड बारामतीत दिली जाईल का? लंडन-ऑलिम्पिकमधील सहाही पदकविजेते, त्यासह ऑलिम्पिक अजिंक्यवीर अभिनव बिंद्रा, विश्वचषक विजेती अन् चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अंजली भागवत, जगज्जेती तेजस्विनी सावंत, ऑलिम्पिक कांस्यपदकाचे मानकरी खाशाबा जाधव, हॉकीपटू मेजर ध्यानचंद, बलबीर, धनराज पिल्ले व बेळगावचा बंडू पाटील, खो-खोपटू राजू द्रविड, श्रीरंग इनामदार, शाम पुरोहित, नितीन जाधव, बिपीन पाटील, पराग आंबेकर, राजेश पाथरे, प्रवीण सिनकर आदींचे कटआऊट्सही लावले गेले पाहिजेत. क्रीडा-संस्कृतीचे दर्शन त्यातूनच घडेल!
सरतेशेवटी सादरीकरणाबाबत आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची. खेळाडूच्या बनियनवर, त्याचं नाव नागरी व रोमन लिपीत ठसठशीतपणे लावले पाहिजे. एरवी या खेळाडूंची ओळख प्रेक्षकांना कशी होणार? केवळ बनियनच्या क्रमांकावरून खेळाडूचे नाव-गाव प्रेक्षकांना कसे समजणार?
या स्पर्धेच्या प्रसिद्धीची व एकंदरीतच खो-खो व खो-खोपटूंची प्रसिद्धी सालाबादप्रमाणे गुंडाळली जाणार? की अजितदादांच्या बारामतीत, बिनचेहऱ्याच्या व अनामिक खो-खोपटूंची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा