वरिष्ठ गटाच्या ४६व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेस बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संघांच्या आगमनासही प्रारंभ झाला आहे.
या स्पर्धेमध्ये पुरुष गटात ३४ तर महिला गटात ३३ संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी पाच मैदाने तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन मैदाने मॅटची असणार आहेत. शनिवारी दुपारी चार वाजता या स्पर्धेस प्रारंभ होत असून त्यानंतर साखळी सामन्यांना प्रारंभ होईल. २५ हजार प्रेक्षक बसतील, इतकी गॅलरी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही विभागांचे प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने सामने होणार आहेत. पुरुष विभागात गतवर्षीच्या उपविजेत्या महाराष्ट्राला साखळी गटात गुजरात, तामिळनाडू, अंदमान व निकोबार, सिक्कीम यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. महिलांमध्ये गतविजेत्या महाराष्ट्रास साखळी गटात तामिळनाडू, चंडीगढ, सिक्कीम व त्रिपुरा यांच्याशी खेळावयाचे आहे. दोन्ही विभागात महाराष्ट्र संघ सहज बाद फेरीत स्थान मिळविल अशी अपेक्षा आहे. दोन्ही विभागात महाराष्ट्रास पहिल्या दिवशी विश्रांती मिळाली आहे.
पुरुष व महिला या दोन्ही गटातील पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या संघांच्या राज्य संघटनांना अनुक्रमे दोन लाख, दीड लाख व एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याखेरीज विजेत्या, उपविजेत्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संघांमधील प्रत्येक खेळाडूला अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा