मुंबई व पुण्याच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीमुळेच यजमान महाराष्ट्राने ५८ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदासह वर्चस्व राखले. महाराष्ट्राने १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली या चारही विभागात सांघिक विजेतेपद मिळविले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत आंतरकचेरी क्रीडा संघटना व राज्य क्रीडा संचालनालय यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील शेवटच्या दिवशी १४ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्राच्या सोम व्होरा (बिर्ला प्रशाला) याने ५० मीटर व २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर वेदांत खांडेपारकर (अंबानी प्रशाला) याने २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रुपेरी कामगिरी केली.
मुंबईच्याच एरिसा मोंगियाने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत कांस्यपदक मिळविले तर ओंकार नेहेते याने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली.
मुंबईचाच खेळाडू इशान जाफर याने २०० मीटर बटरफ्लायमध्ये अजिंक्यपद पटकाविले. सिद्धार्थ संखे यानेही कांस्यपदकाची कमाई केली.
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात सुदेश तांदळेकर याने २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक मिळविले. श्लोक गुप्ताने १०० व २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदक मिळविले. अंतरा अगरवालने ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रुपेरी कामगिरी केली.
अवंतिका चव्हाणने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक मिळविले तर मोनिक गांधीने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णवेध घेतला. त्रिशा भिमानी हिने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत कांस्यपदक संपादन केले तर आकांक्षा बुचडे हिने २०० मीटर बटरफ्लायमध्ये सोनेरी कामगिरी केली. १९ वर्षांखालील गटात रजनी राऊळने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर ऋजुता भट हिने २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक स्मिता देसाई, मुंबई जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव सुबोध डंके, अनुप, योगेश व किशोर शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.      

Story img Loader