National Sports Awards Announced : क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. या दोघांनी जगभरात बॅडमिंटन दुहेरीत भारताचे नाव लौकिक मिळवले आहे. क्रीडा मंत्रालयाने या सर्व नावांना दुजोरा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानेवारीमध्ये सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान हे क्रीडा पुरस्कार दिले जातील. खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडूंची निवड त्यांच्या त्या वर्षातील कामगिरीच्या आधारे केली जाते. क्रीडा विभाग त्याच्या नावाची शिफारस करतो. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत लांब उडीपटू श्रीशंकर, स्टार पॅरा अॅथलीट शीतल देवी, स्टार महिला हॉकीपटू सुशीला चानू यांच्यासह २६ खेळाडूंचा समावेश आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या माहितीनुसार, विविध समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि सखोल तपासणीनंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मंत्रालयाने सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

अर्जुन पुरस्कार –

मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टीहीन क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे, अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि ईशा सिंग (शूटिंग), अनंत पंघाल आणि सुनील कुमार (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), पवन कुमार आणि रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खोखो), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

हेही वाचा – IPL 2024 Auction : ‘CSK’ने ३० कोटींहून अधिक खर्च करून सहा खेळाडू केले खरेदी, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमकुवतपणा

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार: कविता सेल्वराज (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) विनीत कुमार शर्मा (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार –

गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी) द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी): जसकीराज सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंत कुमार पुशीलाल (टेबल टेनिस) मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी २०२३ :गुरुनानक देव विद्यापीठ (अमृतसर, एकूणच विजेते) लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पंजाब, प्रथम उपविजेते) कुरुक्षेत्र विद्यापीठ (द्वितीय उपविजेते)

हेही वाचा – IPL Auction 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या रणनीतीवर माजी कर्णधाराने केले प्रश्न उपस्थित, सांगितली संघातील सर्वात मोठी कमतरता

१२ सदस्यीय समितीने विजेत्या खेळाडूंची नावे निवडली –

क्रीडा मंत्रालयाने यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समिती स्थापन केली होती. अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्याशिवाय हॉकीपटू धनराज पिल्ले, माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता, माजी बॉक्सर अखिल कुमार, महिला नेमबाज आणि विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक शुमा शिरूर, माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे आणि पॉवरलिफ्टर फरमान पाशा यांचाही समितीत समावेश होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National sports awards 2023 announced satwik chirag to get khel ratna arjuna award for md shami check full list vbm