National Sports Day: ऑगस्टचा शेवटचा आठवडा भारतासाठी क्रीडा क्षेत्रात संस्मरणीय ठरला. तीन वेगवेगळ्या खेळांच्या प्रमुख स्पर्धांमध्ये देशाला तीन वेगवेगळी पदके मिळाली. यामुळे क्रीडा दिन स्पेशल झाला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिन साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या ११८व्या जयंतीपूर्वी, भालाफेकपटू नीरज चोप्रा, युवा बुद्धिबळ स्टार प्रज्ञानानंद आणि बॅडमिंटनचा अनुभवी एच.एस. प्रणॉय यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. तिघांनीही देशाला आठवडाभर साजरा करण्याची संधी दिली.
‘या’ तिन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया:
नीरज चोप्रा
भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने २७ ऑगस्ट रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये इतिहास रचला. नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो देशातील पहिला अॅथलीट ठरला. नीरजने बुडापेस्ट नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये भालाफेक स्पर्धेत ८८.१७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक मिळवले.
ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन असलेल्या या खेळाडूने या स्पर्धेपूर्वी केवळ जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले नाही तर याआधीही अशी कामगिरी त्याने केली आहे. आता त्याच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक आले आहे. गेल्या वेळी नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्याने यावेळी पदकाचा रंग बदलला.
प्रज्ञानानंद
२४ ऑगस्ट रोजी १८ वर्षीय बुद्धिबळपटू प्रज्ञानानंद याने सर्वांची मने जिंकली. बुद्धिबळ विश्वचषकात त्याने रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध हरला असेल, पण भविष्यात आपण ही स्पर्धा अनेक वेळा जिंकू शकतो, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळल्यानंतर, प्रज्ञानानंद दिग्गज बॉबी फिशर आणि कार्लसन यांच्यानंतर उमेदवारांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
प्रज्ञानानंद वयाच्या १२व्या वर्षी ग्रँडमास्टर झाले. त्याचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे झाला. वयाच्या तिसर्या वर्षी तो बुद्धिबळात उतरला. प्रज्ञानानंद यांचे वडील रमेशबाबू बँकेत काम करतात. पोलिओची लागण होऊनही त्यांनी हिंमत न हारता मुलांचे उत्तम संगोपन केले. प्रज्ञानानंदांची मोठी बहीण वैशाली ही सुद्धा हा खेळ खेळते आणि तिला पाहूनच प्रज्ञानानंद बुद्धिबळ खेळू लागला. प्रत्येक दौऱ्यात त्याची आई त्याच्यासोबत असते. कौटुंबिक प्रेमामुळे तो आज जगभरात प्रसिद्ध झाला आहे.
एच.एस. प्रणय
भारताचा दिग्गज बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३ मध्ये एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही. शनिवारी (२६ ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत त्याला थायलंडच्या कुनलावत विटिडसर्नविरुद्धच्या कडव्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही प्रणयने कांस्यपदक जिंकले. मात्र, प्रणॉयला पहिल्यांदाच जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्यात यश आले आहे.
जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा प्रणॉय हा पाचवा भारतीय पुरुष एकेरी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत (रौप्य), लक्ष्य सेन (कांस्य), बी साई प्रणीत (कांस्य) आणि प्रकाश पदुकोण (कांस्य) यांनी पदके जिंकली आहेत. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने २०१९ मधील सुवर्णासह जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकेरीत पाच पदके जिंकली. त्यांच्याशिवाय सायना नेहवालने (रौप्य आणि कांस्य) दोन पदके जिंकली होती. ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरी जोडीने २०११ मध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गेल्या वर्षी कांस्यपदक जिंकले होते.