टिपटूर : भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो संघटनेने आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा स्पर्धेच्या दोन गटांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र व कर्नाटक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
टिपटूर येथे होत असलेल्या स्पर्धेत किशोर गटात उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा यांच्यात झाला. साखळी सामन्यात तेलंगणा संघाने महाराष्ट्रला झुंजवले होते. उपांत्य फेरीत महाराष्ट्रच्या आक्रमक खेळापुढे तेलंगणाच्या खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. हा सामना महाराष्ट्रने एक डाव ६ गुणांनी (२२-१६) असा जिंकला. विजयी संघातर्फे ओमकार सावंत (२.४०मि. संरक्षण व २ गुण), श्री दळवी (२.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान कर्नाटक संघाने दिल्लीचा चुरशीच्या झालेल्या सामन्यात ४ गुणांनी (२८-२४) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा >>>IND vs SA 1st ODI : ‘काही षटके टाकल्यानंतरच मला श्वास…’, विजयानंतर पाच विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगची प्रतिक्रिया
किशोरी गटात महाराष्ट्राने राजस्थानचा ४ गुण आणि ०.५० सेकंद (२६-२२) राखून पराभव केला. विजयी संघातर्फे मैथिली पवार (२.४० मि., १.५० मि. संरक्षण व ४ गुण), स्नेहा लोमकाणे (१ मि., १.२० मि. संरक्षण व १० गुण), कल्याणी लोमकाणे (१.३० मि., १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान कर्नाटकने कोल्हापूरचा ४ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे विद्यालक्ष्मी (२.१०, १.१० मि. संरक्षण), गौतमी (२.३०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी महत्त्वाची खेळी केली.