Navdeep Singh Wins Gold in Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये रविवारी भारताच्या नवदीप सिंगनं सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि देशाच्या पारड्यात आणखी एक पदक आलं. नवदीपच्या या कामगिरीमुळे भारताचं पदकतालिकेतलं स्थान भक्कम झालं. पण नवदीपला मात्र त्याचं हे स्थान मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष एखाद्या चित्रपटात शोभेल असाच आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कायम ढाल बनून उभ्या राहणाऱ्या नवदीपच्या वडिलांचं निधन झालं. पण तो धक्का पचवून मैदानात उतरलेल्या नवदीपनं देशाला नवी सुवर्णझळाळी मिळवून दिली.
४ फूट चार इंच उंची असणाऱ्या नवदीपनं तब्बल ४७.३२ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. सुरुवातीला नवदीप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्याचं रौप्यपदक निश्चित झालंच होतं. पण पहिल्या क्रमांकावरच्या इराणच्या सादेह बैत सयाहला गैरवर्तनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर नवदीपचं सुवर्णपदक निश्चित झालं.
जन्मापासूनच सुरू झाला नवदीपचा संघर्ष
नवदीपचा या सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास त्याचं प्रशिक्षण सुरू होण्याच्याही कित्येक वर्षं आधीपासून, म्हणजे अगदी त्याच्या जन्मापासूनच सुरू होतो. बुआना लाखू या हरियाणातल्या एका गावात २००० साली नवदीपचा जन्म झाला. वेळेआधीच म्हणजे सातव्या महिन्यातच नवदीप जन्माला आला. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी त्याच्या आई-वडिलांना समजलं की त्याला कमी उंचीची समस्या आहे. त्याचे वडील पंचायत समितीचे पदाधिकारी होते, तर आई त्याला उपचारांसाठी दिल्ली आणि रोहतकला घेऊन जायची. पण त्या उपचारांचा फारसा काही परिणाम झाला नाही.
लहानपणी गावातल्या शाळेत शिकत असताना नवदीपला ‘बुटका’ म्हणून प्रचंड हेटाळणीचा सामना करावा लागला. त्याच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून सगळेच त्याची हेटाळणी करायचे. “नवदीप लहानपणी स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा. मग बरेच दिवस बाहेरच येत नव्हता. आजूबाजूची सगळी मुलं त्याला ‘बुटका’ म्हणून चिडवायची”, अशी आठवण नवदीपचा मोठा भाऊ मनदीप शेरन सांगतो.
“माझे वडील दलवीर सिंग मग त्याला पुस्तकं आणून द्यायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे, त्याला धीर द्यायचे. प्रोत्साहन द्यायचे. दोन महिन्यांपूर्वीच आमच्या वडिलांचं निधन झालं. पण आज नवदीपचं जागतिक स्तरावरचं हे सर्वोच्च स्थान पाहून आमच्या वडिलांना सर्वाधिक गर्व वाटला असता”, अशा शब्दांत मनदीपनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्याच्या भावना व्यक्त केल्या.
अवघ्या १२व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार
गावातल्या सरकारी शाळेत शिकतानाच नवदीपनं अॅथलेटिक्समध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. अनेक शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि पुढे राष्ट्रीय स्तरावरही त्यानं स्पर्धा जिंकल्या. २०१२ मध्ये म्हणजेच वयाच्या १२व्या वर्षी नवदीपला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
“आमचे वडील कुस्तीपटू होते. नवदीपनंही सुरुवातीला स्थानिक पातळीवर कुस्ती खेळायला सुरुवात केली. पण त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे त्याला कुस्तीपटू बनण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावं लागलं. मग त्यानं शाळेत अॅथलेटिक्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तो दिव्यांग विद्यार्थी गटाबरोबरच सामान्य गटातही स्पर्धा खेळायचा. त्याला जेव्हा राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाला, तेव्हा सगळ्या गावानं त्याचा सन्मान केला”, असंही मनदीप सांगतो.
पुरस्कार मिळाल्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २०१६ मध्ये नवदीपनं दिल्लीत प्रशिक्षणाला सुरुवात केली. नवल सिंग यांच्या हाताखाली नवदीप तयार होऊ लागला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर २०१९ मध्ये त्यानं स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं.
नीरज चोप्राच्या कामगिरीमुळे नवदीप प्रभावित
“आम्ही जेव्हा दिल्लीला यायचं ठरवलं, तेव्हा नवदीप नीरज चोप्राच्या वर्ल्ड ज्युनिअर अंडर २० वर्ल्ड रेकॉर्डमुळे प्रभावित झाला होता. तेव्हा मी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाले आणून द्यायचो. त्याच्या प्रशिक्षणासाठी वडिलांनी त्यांच्या एलआयसी पॉलिसीवर कर्जही काढलं होतं”, असंही मनदीपनं सांगितलं.
२०१९ च्या वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिपमध्ये नवदीप ३१.६२ मीटरच्या भालाफेकीसह ९व्या स्थानावर राहिला. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यानं ४३.७८ मीटर ही वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी साधली. त्या आधारावर तो टोक्यो पॅरालिम्पिकसाठी पात्र झाला. तिथे ४०.८० मीटर थ्रोसह तो चौथ्या स्थानी राहिला. तिसरं स्थान थोडक्यात हुकलं. त्यानंतर त्यानं भारताचे नॅशनल चॅम्पियन व इंडियन पॅरा टीमचे प्रशिक्षक विपिन कसाना यांच्या हाताखाली प्रशिक्षणाला सुरुवात केली.
…अशी झाली नवदीपची तयारी!
“नवदीपच्या आधी मी कोणत्याही कमी उंचीच्या खेळाडूला प्रशिक्षण दिलं नव्हतं. पण त्यानंतर मीदेखील त्याच्या उंचीच्या खेळाडूंना किती प्रकारे थ्रो करता येऊ शकेल, हे शिकून घेतलं. यात सगळ्यात महत्त्वाचं होतं त्याला २.२ मीटर लांबीच्या भाल्याची सवय होणं आणि त्यानं भालाफेकीसाठी लागणारी ताकद त्याच्या खांद्यांच्या मदतीने निर्माण करणं. तो कधीकधी त्याच्या रनअपमध्येच इतकी ताकद लावायचा की त्यामुळे त्याच्या थ्रोवर परिणाम व्हायचा. त्यानंतर आम्ही त्याच्या वेगावर काम केलं”, अशी प्रतिक्रिया त्याचे प्रशिक्षक विपिन कसाना यांनी दिली.
नवदीपचा भाऊ मनदीपला पूर्ण खात्री आहे की तो त्याचं हे पदक कसं सेलिब्रेट करेल. तो सांगतो, “नवदीप नेहमी त्याची पदकं गावातल्या लहान मुलांना दाखवतो. यावेळीही तो हेच करेल”!