Naveen-ul-Haq dropped from Asia Cup squad: अफगाणिस्तानने बुधवारपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२३ साठी आपला संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकचा १७ सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही त्याची संघात निवड झाली नव्हती. राष्ट्रीय संघातून सतत दुर्लक्ष केल्यावर नवीनने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अफगाणिस्तानचा हा वेगवान गोलंदाज आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहलीशी भिडल्यापासून चर्चेत आहे.
नवीन दोन वर्षांपासून वनडे संघाबाहेर –
२३ वर्षीय नवीन दोन वर्षांहून अधिक काळ अफगाणिस्तानच्या वनडे संघातून बाहेर आहे. त्याने जानेवारी २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तान संघासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. या वेगवान गोलंदाजाने अफगाणिस्तानसाठी फक्त ७ वनडे खेळले आहेत, ज्यात त्याने २५.४२च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या आहेत.
एकदिवसीय संघात स्थान गमावल्यानंतर नवीनने इन्स्टाग्रामवर लिहिले, “तुमचे डोळे अंधाराशी किती चांगले जुळवून घेतात, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही याला कधीही प्रकाश समजण्याची चूक करणार नाही.”
अफगाणिस्तान संघाबद्दल बोलायचे झाले, तर नवीन व्यतिरिक्त शाहिदुल्ला कमाल आणि वफादर मोमंद यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. राशिद खान, मोहम्मद नबी, नूर अहमद आणि मुजीब उर रहमान यांसारखे फिरकीपटू संघाला मजबूत करतील. यासह सहा वर्षांपूर्वी (फेब्रुवारी २०१७ विरुद्ध झिम्बाब्वे) अफगाणिस्तानसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेला करीम जनात संघात परतला आहे. शराफुद्दीन अश्रफही जानेवारी २०२२ नंतर प्रथमच संघात परतला आहे. संघाची कमान हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आली आहे.
आशिया चषक २०२३ साठी अफगाणिस्तान संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, राशिद खान, गुलबदीन नायब, करीम जनात, अब्दुल रहमान शेर, रियाज हसन. शेराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी, फजल-हक फारुकी.