IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाविरोधात बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नच्या मैदानावार भारताला १८४ धावांनी पराभव झाला. या सामन्यात ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने चांगली झुंज दिली. मात्र ट्रॅव्हिस हेडच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत बाद झाला. या विकेटचा आनंद साजरा करत असताना ट्रॅव्हिस हेडने वादग्रस्त पद्धतीने हातवारे केले. याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने सदर सेलिब्रेशनचा अर्थ वेगळा होता, हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता भारतीय क्रिकेटपटूंनी हेडच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटपटू, राजकारणी नवज्योतसिंग सिध्दू म्हणाले की, हा दीडशे कोटी भारतीयांचा अपमान आहे. त्याच्यावर कडक अशी कारवाई करून त्याला शिक्षा दिली गेली पाहीजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवज्योतसिंग सिद्धू यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मेलबर्न कसोटी सामन्यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने केलेले हातवारे जेन्टलमन्स गेमला शोभणारे नाहीत. स्टेडियममध्ये लहान मुले, महिला, वृद्ध असे अनेकजण सामना पाहायला आलेले असतात, त्यांच्या समोर चुकीचे उदाहरण प्रस्थापित होत आहे. त्याच्या कृतीमुळे एका व्यक्तीचा नाही तर भारतातील दीडशे कोटी जनतेचा अपमान झाला आहे. त्याला अशी कडक शिक्षा दिली जावी की, भविष्यात कुणीही अशाप्रकारे आगळीक करणार नाही.”

अनेक भारतीयांनी हेडच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यात काही वावगे वाटत नाही. सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार पॅट कमिन्सने हेडच्या कृतीवर प्रश्न विचारला असता त्याचे समर्थन केले. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या विधानाचा व्हिडीओ त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. तसेच हेडच्या सेलिब्रेशनचा एक जुना संदर्भही दिला आहे. ज्यामध्ये बर्फा एका ग्लासमध्ये भरून त्यात हेडने बोट टाकलेले दिसत आहे.

हे वाचा >> IND vs AUS : ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे वादग्रस्त सेलिब्रेशन, विराटप्रमाणे होणार का कारवाई?

कमिन्सने पुढे म्हटले की, २०२२ मध्ये श्रीलंकेच्या विरोधात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेडने चार गडी बाद केले होते. त्या सामन्यात हेडच्या बोटाला इजा झाल्यामुळे त्याला थोडी अडचण येत होती. त्यावेळी त्याने बर्फ भरलेल्या ग्लासमध्ये बोट टाकले होते. ऋषभ पंतला बाद केल्यानंतर हेडने त्या जुन्या आठवणीला पुन्हा उजाळा दिला.

दरम्यान तिसऱ्या कसोटीत पाचव्या दिवशी भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १५५ धावांवर ढासळला. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu has called for strict action against travis head for his celebration after dismissing rishabh pant kvg