वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद करणारा इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. सरावादरम्यान इशांतच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागेवर उमेश यादवला संधी देण्यात आली. मात्र इशांच्या या दुखापतीमुळे, तो आयपीएलच्या आगामी हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. याचसोबत बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फिजीओ आशिष कौशिक यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

पहिल्या कसोटीआधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधून इशांत शर्मा खेळण्यासाठी फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ५ बळी घेताना इशांतने २३ षटकं टाकली. त्यातच इशांतच्या वैद्यकीय अहवालाबद्दलही भारतीय संघ व्यवस्थापनाने अधिक काही न सांगितल्यामुळे NCA फिजीओंच्या कारभारावर शंका घेण्यात येत आहे.

दिल्लीकडून रणजी सामन्यात खेळत असताना इशांतला दुखापत झाली होती. यावेळी दिल्ली संघाच्या फिजीओंनी इशांत किमान ६ आठवडे खेळू शकणार नसल्याचं सांगितलं होतं. मग आशिष कौशिक आणि NCA यांनी कोणत्या आधारावर ३ आठवड्यात इशांत खेळण्यासाठी फिट असल्याचं जाहीर केलं?? बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्यानेही इशांतच्या दुखापतीवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात इशांत या दुखापतीमधून कधी सावरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.