Netherland vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेतील ३४वा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स आमनेसामने आले होते. नेदरलँड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४६.३ षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदीच्या अर्धशतकाच्या जोरावर ३१.३ षटकांत ३ गडी गमावून १८१ धावा करत विजय मिळवला.
अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा चौथा विजय आहे आणि संघ पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानच्यावर पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने अत्यंत खराब कामगिरी केली. या संघाचे पहिल्या पाचपैकी चार फलंदाज धावबाद झाले. या कारणामुळे संघ ४६.३ षटकात १७९ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ३१.२ षटकांत ३ गडी गमावून १८१ धावा केल्या आणि सामना जिंकला. अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमतुल्लाने सर्वाधिक नाबाद ५६ धावा केल्या. रहमत शाहने ५२ धावांची खेळी केली. अजमतुल्ला ३१ धावा करून नाबाद राहिला. नेदरलँडसाठी लोगान व्हॅन बीक, व्हॅन डर मर्वे आणि साकिब झुल्फिकार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नेदरलँड्ससाठी सायब्रँडने सर्वाधिक ५८ धावा केल्या. ओडवाडने ४२ आणि ओकरमनने २९ धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ व्हॅन डर मर्वे (११ धावा) आणि आर्यन दत्त (१० धावा) यांना दुहेरी आकडा गाठता आला. नेदरलँडचे सहा फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. कर्णधार एडवर्डस आपले खातेही उघडू शकला नाही. नेदरलँडचे चार फलंदाज धावबाद झाले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने तीन आणि नूर अहमदने दोन गडी बाद केले. मुजीबला एक विकेट मिळाली.
अफगाणिस्तानने गुणतालिकेत पाकिस्तानला टाकले मागे –
या विजयासह अफगाणिस्तान संघाने गुणतालिकेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचा संघ गुणांच्या बाबतीतही पाकिस्तानच्या पुढे झाला आहे. अफगाणिस्तानचे आता ७ सामन्यांतून चार विजयांसह ८ गुण झाले आहेत. हा संघ आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. या पराभवानंतर नेदरलँड्सचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले आहे. डच संघाने आता ७ पैकी पाच सामने गमावले आहेत. तर या संघाने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध दोन सामने जिंकले आहेत.